आरळेच्या शहाजी पाटीलसह मुलांवर फसवणूकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:38 PM2019-02-16T14:38:15+5:302019-02-16T14:39:37+5:30
ग्रामसेवक महिलेची फसवणूक केलेप्रकरणी करवीरच्या माजी पंचायत समिती सभापतीसह त्याच्या दोन मुलांवर शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित माजी सभापती शहाजी हिंदूराव पाटील, त्यांची मुले सागर व कृष्णात पाटील (रा. आरळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : नागदेववाडी (ता. करवीर) येथील विक्री केलेल्या घरावर परस्पर तारण कर्ज चार लाख रुपये बँकेकडून घेवून ते बळकाविण्याचा प्रयत्न करुन ग्रामसेवक महिलेची फसवणूक केलेप्रकरणी करवीरच्या माजी पंचायत समिती सभापतीसह त्याच्या दोन मुलांवर शुक्रवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित माजी सभापती शहाजी हिंदूराव पाटील, त्यांची मुले सागर व कृष्णात पाटील (रा. आरळे, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी ग्रामसेविका अमिता अजय निळकंठ (वय ३६, रा. दर्शन-दौलत अपार्टमेंन्ट, बिनखांबी गणेश मंदिर परिसर कोल्हापूर) यांनी २०११ मध्ये संशयित शहाजी पाटील याच्या नागदेववाडी येथील बिगरशेतीमधील प्लॉट नंबर डी-११ येथील घर २६ लाख रुपयांना खरेदी केले होते.
खरेदी दस्त होवून त्याची सात-बारा उताऱ्याला नोंद झाली नव्हती. या मिळकतीला अमिता निळकंठ यांचे नाव लागले नसल्याचे पाहून संशयितांनी शाहुपूरी पहिल्या गल्लीतील श्रीपतराव दादा सहकारी बँकेकडून मिळकतीवर चार लाख रुपये तारण कर्ज घेतले. त्यानंतर ही जागा व घर आपले असून निळकंठ यांचे प्रापंचिक साहित्य बाहेर फेकून दिले. त्यांची दूचाकीही रस्त्यावर नेवून लावली. त्यानंतर आपली स्वत:चे वाहन जागेत लावले.
पुन्हा घरी आलीस तर ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिली. निळकंठ यांनी तीन महिन्यापूर्वी पोलीसांत तक्रार दिली होती. परंतू राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास करवीर पोलीस टाळाटाळ करीत होते. अखेर त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.
आम्हाला न्याय द्या
संशयितांकडून आमचे घर बळकाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचेकडून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती फिर्यादी अमिता निळकंठ यांनी केली आहे.