सीपीआरमधील नवजात अर्भक मृत्यू प्रमाण घटले -आरोग्य विभागाचे यश : तत्पर आरोग्यसेवा, उपचार पद्धतीतील बदलांचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:06 AM2018-01-17T01:06:32+5:302018-01-17T01:07:00+5:30
कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली
गणेश शिंदे ।
कोल्हापूर : ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा, उपचार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) गेल्या वर्षभरात नवजात अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षभरात २५१ अर्भकांचा मृत्यू झाला असून, २०१६ च्या तुलनेत त्यामध्ये ३२ ने घट झाली आहे.
गर्भवती महिलेला वेळेत न मिळणारी आरोग्य सेवा, प्रसूतीदरम्यान मिळणारी तोकडी उपचारपद्धती यामुळे नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. अर्भक मृत्यू हे राज्याच्या आरोग्य विभागासमोरील आव्हान होते. त्यावर मात करण्याचे काम छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने केले आहे.
महाराष्ट्रात नवजात अर्भकांचा मृत्यू कमी होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सातत्याने यासाठी आरोग्य विभाग विविध योजना, आरोग्य सेवा देत आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामधील अद्ययावत उपकरणे, २४ तास सेवेत असलेले बालरोगतज्ज्ञ, परिचारिका, सर्व महत्त्वाच्या तपासण्या, औषधांची मोफत उपलब्धता, आदी नवजात अर्भकांचा मृत्यूदर कमी होण्याची प्रमुख कारणे आहेत. नवजात शिशू विभागाची स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.
सन २०१६ या वर्षात १९६२ नवजात अर्भके सीपीआरमध्ये दाखल झाली. त्यातील २८३ मृत झाली. त्याचे प्रमाण १४.४ टक्के आहे.
गेल्यावर्षी १९७१ नवजात अर्भके दाखल झाली. त्यामध्ये २५१ अर्भके मृत झाली. नवजात शिशू विभाग सन १९९७ ला केवळ चार-पाच अर्भकांच्या उपचार करण्यापुरता चालू करण्यात आलेला होता. स्थानिक रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवजात शिशू विभागाची ‘ककुन’ या प्रकल्पाकरिता निवड करून हा विभाग अद्ययावत करण्याकरिता मोलाचा हातभार लावला आहे.
या विभागामध्ये सध्या पाच व्हेंटिलेटर्स, तीन सिपॅप मशिन्स (प्रामुख्याने प्रीमॅच्युअर अर्भकांकरिता लागणारे व्हेंटिलेटर्स), २५ इन्क्युलेटर्स, मल्टिपॅरा, मॉनिटर्स, सिरिज पंप, फोटो थेरपी उपचार, सेंट्रल आॅक्सिजन, सेंट्रल सेक्शन आदी खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. महिन्याला अंदाजे १५० ते २२५ बालके दाखल होतात व त्यातील दहा ते १५ टक्के बाळांना वाचविण्यात यश येत नाही. ही आकडेवारी राज्यातील इतर शासकीय तसेच खासगी रुग्णालयामध्ये हा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के जास्त आहे, असे प्रशासनाने सांगितले.
गर्भवतीने घ्यावयाची काळजी....
अतिश्रम टाळले पाहिजे, पोषण संपूर्ण आहार घेतला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे.
वैद्यकीय अधिकाºयांकडून होणाºया रक्त तपासण्या, सोनोग्राफी, रक्तदाब तपासणी, एच.आय.व्ही तपासणी व नियमित लसीकरण.
नवजात अर्भक मृत्यू प्रमाण रोखणे हे आरोग्य विभागासमोर हे एक आव्हान आहे. त्यासाठी गेले वर्षभर प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला.
- डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर, कोल्हापूर.