बावड्यात घुसखोरीचा डाव
By admin | Published: August 11, 2015 12:43 AM2015-08-11T00:43:00+5:302015-08-11T00:43:00+5:30
महाडिकांची भिस्त नाराजांवर : उमेदवार देताना सतेज पाटलांची कसरत
रमेश पाटील - कसबा बावडा महापालिका निवडणुकीत कसबा बावड्यातील आपल्या गटाचे, पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून यावेत म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बावड्याकडे आतापासूनच नजरा लागल्या आहेत.
बावड्यातील प्रत्येक प्रभागात महाडिक गटाचा उमेदवार असणार असल्याचे माजी नगरसेवक व राजाराम कारखान्याचे संचालक हरीश चौगले व दिलीप उलपे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू ठेवली आहे. शिवसेनेकडे प्रत्येक प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार असावा यादृष्टीने क्षीरसागर यांनी चाचपणी सुरू ठेवली असल्याचे कसबा बावडा शिवसेना शाखेचे प्रमुख सुनील जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बावड्यातील प्रत्येक प्रभागात तिरंगी लढती पाहावयास मिळणार आहे. या प्रमुख तिरंगी लढतींशिवाय अपक्ष उमेदवार रिंगणात मोठ्या संख्येने उतरण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या राजाराम साखर कारखाना निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे पॅनेल विजयी झाले. निवडणुकीच्यावेळी दिलेल्या त्रासाचा वचपा काढण्यासाठी सतेज पाटील यांच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न महाडिक गटाकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रत्येक प्रभागात ताकदीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे.
दरम्यान, बावड्यातून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. बहुतेकांना सतेज पाटील गटाची उमेदवारी हवी आहे; पण प्रभागात केवळ एकालाच संधी मिळणार आहे. अशा वेळी काहीजण नाराज होण्याची शक्यता आहे. अशा नाराजांवर लक्ष ठेवण्याचे काम महाडिक गटाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाराज विरोधकांच्या गळाला लागू नये याची काळजीही सतेज पाटील गटाला घ्यावी लागणार आहे. कसबा बावडा परिसरात पाच प्रभाग आहेत. या सर्व प्रभागांत सध्या सतेज पाटील गटाचे नगरसेवक आहेत. प्रतिस्पर्ध्यांना शह देण्यासाठी महाडिकांच्या दृष्टीने बावड्यातील विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच येथील लढती अटीतटीच्या होणार हे मात्र निश्चित..!