परमारांच्या प्रभागात फरासांची घुसखाेरी; विकास कामाचे केले परस्पर उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:05+5:302020-12-23T04:20:05+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असताना, प्रभागातील घुसघोरी एकवेळ समजू शकतो, परंतु एखाद्या प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन दुसऱ्या ...
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असताना, प्रभागातील घुसघोरी एकवेळ समजू शकतो, परंतु एखाद्या प्रभागातील विकास कामाचे उद्घाटन दुसऱ्या प्रभागातील नगरसेवकाने करणे आणि त्याचे श्रेय लाटणे म्हणजे जरा जास्तच झाले. पण असा प्रकार प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक येथे घडला. त्यासंदर्भातील तक्रार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे झाली आहे.
मागच्या सभागृहात प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौकचे नेतृत्व ईश्वर परमार यांनी केले. त्यांनी त्या भागात जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा प्रयत्न केला. बिंदू चौकाजवळील गंजी गल्ली ते बडी मस्जिद या रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली आहे. खुदाईमुळे तेथील रस्ता खराब झाला. तो पेव्हर पध्दतीने करण्यासाठी परमार यांनी त्यांच्या बजेटमधून दहा लाख रुपयांचे काम मंजूर करून घेतले होते. परंतु या कामाचा प्रारंभ परमार यांना अंधारात ठेवून हसीना फरास व आदिल फरास यांनी परस्पर करुन घेतला.
या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांना फरास यांनी निमंत्रित केले होते. तसा डिजिटल फलक कार्यक्रमाच्या ठिकाणी लावला होता. ही बाब परमार यांच्या लक्षात येताच त्यांनी मंत्री मुश्रीफ व पाटील यांना वस्तुस्थिती सांगत तक्रार केली. पालकमंत्री पाटील यांनी कार्यक्रमास जायचे टाळले. पण मुश्रीफ यांनी त्या कार्यक्रमास हजेरी लावली. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा हा प्रयत्न मात्र प्रभागात चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रम झाल्यामुळे नागरिकांना मात्र त्यामागची खरी माहिती मिळाली. हसीना फरास या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.