हलकर्णीत सार्वजनिक प्रसाधनगृहाअभावी महिलांची घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:24+5:302021-06-22T04:17:24+5:30
हलकर्णी : ६ हजार लोकसंख्या, भागातील खेड्यांची मोठी बाजारपेठ व जिल्हा परिषद मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या हलकर्णीत महिलांकरिता ...
हलकर्णी :
६ हजार लोकसंख्या, भागातील खेड्यांची मोठी बाजारपेठ व जिल्हा परिषद मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या हलकर्णीत महिलांकरिता शौचालय अथवा प्रसाधनगृह नाही. यामुळे बाजार व अन्य कारणास्तव गावात येणाऱ्या महिलांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. साधारण ३० लाख इतके वार्षिक उत्पन्न वेगवेगळ्या मार्गाने मिळणाऱ्या या ग्रामपंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायत महिला आरक्षणाकडे नजर टाकल्यास विद्यमान सरपंच योगिता संगाज यांच्यासह ५ महिलांनी गावच्या सरपंचपदाची धुरा वाहिली आहे. मागील व आताच्या पंचकमिटीत महिला सदस्य संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक म्हणजे एकूण १३ सदस्यांपैकी ७ सदस्य या महिला असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
गावात एक मोठे आरोग्य केंद्र तर ९ खासगी दवाखाने आहेत, ३ मोठ्या बँका आहेत, भागातील खेड्यात जाण्याबरोबर संकेश्वर, बेळगाव, कोल्हापूर येथे जाण्यासाठी हलकर्णी हे मुख्य सेंटर आहे. त्यामुळे गावात कायमच परगावच्या महिलांची वर्णी असते. शिवाय बुधवारी गावचा बाजार भरत असल्याने या दिवशी तर गावात महिलांची गर्दी असते.
काही सुशिक्षित महिला गावातील खासगी दवाखान्यात किंवा आपल्या ओळखीच्या ठिकाणी विनंती करून प्रसाधनगृहाचा वापर करतात. अनेकांना तर या सोयीअभावी आडोसा शोधावा लागतो. सध्या गावचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे आडोसा मिळणेही कठीण बनले आहे. त्यामुळे ही समस्या अधिक तीव्र बनली आहे. ग्रामपंचायत मालकीची तसेच गावात गायरान स्वरूपात मोकळी जागा अनेक ठिकाणी आहे. तिथे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.