खासगी स्कूलबस चालकांना अनंत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:40+5:302021-07-12T04:16:40+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे खासगी स्कूल बस चालक-मालक आणि सहायक हवालदिल झाले आहेत. यात ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे खासगी स्कूल बस चालक-मालक आणि सहायक हवालदिल झाले आहेत. यात कोण भाजीपाला, तर कोण सेंट्रिंग कामाला वा कोण शेतात शेतमजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. सध्या जिल्ह्यात ७५० स्कूलबसेस आहेत. त्यांपैकी २५० हून अधिक खासगी मालकांच्या स्कूल बसेस आहेत.
कोरोना संसर्गापूर्वी शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींकरिता स्कूल बसची गरज लागत होती. त्यामुळे अनेकांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा विकून मोठ्या जादा आसनक्षमतेच्या बसेस वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या रूपाने घेतल्या. मार्च २०२० नंतर जगभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजविला. त्यामुळे भारतातही शाळा, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये बंद करण्यात आली. प्रत्येकाचे वर्क फ्राॅम होम सुरू झाले. शाळांमधील विद्यार्थ्यांचीही ऑनलाईन शाळा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत पोहोचविणाऱ्या स्कूल बसेस बंद ठेवण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता शासनाने घेतलेला निर्णय जरी चांगला असला तरी तो स्कूल बसमालक, चालक आणि सहायकांच्या रोजीरोटीवर आला आहे. त्यामुळे स्कूलबस दारात इतक्या दिवस उभ्या केल्यामुळे वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी दारात येऊन कर्ज भरण्याबद्दल नोटीस देऊन जात आहेत. याशिवाय अनेकांना दंडव्याज सुरू झाले आहे. त्यामुळे येत्याकाळात शासनाने बँकांचे व्याज व पासिंग, विमा हप्त्यात सूट द्यावी, अशी मागणी स्कूलबस मालक, चालकांकडून होत आहे.
गाडीवरील कर्ज कसे फेडणार?
प्रतिक्रिया
बस दारात उभी असल्यामुळे मानसिक व अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. हातांना कोणतेच काम नसल्यामुळे बससाठी घेतलेले कर्ज अंगावर आले आहे. सध्या मी दुसऱ्याची रिक्षा फिरवून उदरनिर्वाह करीत आहे.
- संदीप माने, बसमालक, कोल्हापूर
प्रतिक्रिया
बस दारात उभी असल्यामुळे कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न मला पडला आहे. बदली चालक म्हणून अन्य चारचाकींवर मिळेल त्याप्रमाणे काम करीत आहे. सरकारने टॅक्स, पासिंगसह बँकांच्या व्याजातही सूट देऊन दिलासा द्यावा.
- किशोर जाधव, कोल्हापूर
चालकाचे हाल वेगळेच
कोरोनामुळे बस दारात उभी आहे. त्यामुळे सध्या मी बांधकामावर सेंट्रिंग कामासाठी जात आहे.
शिवाजी भास्कर, स्कूलबस चालक, पिराचीवाडी
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत केवळ दोन महिनेच स्कूलबस सुरू झाली. त्यानंतर आजतागायत ही बस दारात उभी आहे. त्यामुळे काम नाही.
- मनोज देवाडकर, पिराची वाडी.
जिल्ह्यातील एकूण शाळा - १०४०
एकूण स्कूल बसेस - ७५०