गॅस दरवाढीमुळे महागाईचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:42+5:302021-07-10T04:17:42+5:30
भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावेल व त्यांना स्वयंपाक करताना धुराचा त्रास होणार नाही. या हेतूने ...
भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावेल व त्यांना स्वयंपाक करताना धुराचा त्रास होणार नाही. या हेतूने गॅस कनेक्शन देण्यात आले. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला या योजनेतून मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. याबरोबरच शून्य रुपयात राष्ट्रीय बँकेत सेव्हिंग खाते काढून देण्यात आले. त्यावेळी गॅसच्या किमती कमी होत्या. तसेच सबसिडी बँक खात्यावर जमा होत होती. यामुळे अनेक गरीब कुटुंबांना याचा लाभ झाला. मात्र गेल्या दोन वर्षांत गॅसच्या किमती भयानक वाढल्या असून सबसिडीही शासनाने बंद केली आहे. तर दुसरीकडे संपूर्ण तालुका गॅस कनेक्शन झाल्यामुळे रॉकेलमुक्त तालुका घोषित करण्यात आला आणि तालुक्यातील रॉकेल विक्री केंद्र बंद करून रॉकेल बंद करण्यात आले. यामुळे सध्या गरीब कुटुंबात चुलीवरचा स्वयंपाक करण्याची वेळ आली असून महागाईमुळे गॅसही नाही, रॉकेल नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील महिलांसमोर स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.