Navratri -उपवासाच्या साहित्याची आवक, खरेदीला बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 10:44 AM2019-09-28T10:44:03+5:302019-09-28T11:01:35+5:30
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठेत उपवासाच्या साहित्याची मोठी आवक झाली आहे. या काळात बहुतांश नागरिकांचे नवरात्राचे उपवास असल्याने या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी होत आहे.
स्त्रीशक्तीच्या आराधनेचा कालावधी असलेल्या नवरात्रौत्सवात मोठ्या संख्येने महिला व पुरुषदेखील नऊ दिवस उपवास करतात, व्रतस्थ राहतात. काहीजण एकवेळ जेवून तर काहीजण दोन्ही वेळ केवळ फळे किंवा उपवासाचे पदार्थ खातात. त्यामुळे सध्या बाजारपेठेत साबूदाणा, शेंगदाणे, शेंगाड्याचे पीठ, वरीचे तांदूळ, खजूर, विविध प्रकारची फळे अशा साहित्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.
शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट, टिंबर मार्केट, बाजारगेट अशा बाजारपेठांमध्ये दुकानदारांनी उपवासाच्या पदार्थांची मांडणी केली आहे. सध्या लोकांना बाजारपेठेत जाऊन साहित्य खरेदी करण्याइतका वेळ नाही; त्यामुळे शहर व उपनगरांतील रस्त्यांच्या कडेला, चौकाचौकांमध्ये गाड्यांवर फळांची मांडणी करून व्यावसायिक उभे आहेत.
मंदीमुळे दर स्थिर
मंदी आणि श्रावणात आलेला महापूर यांमुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत उपवासाचे साहित्यच नव्हे तर सर्व प्रकारच्या धान्यांचे दर स्थिर आहेत. साहित्याला मागणी वाढली की त्याचे दर वाढतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र सण-उत्सवांचा कालावधी असला तरी नागरिकांकडून साहित्याच्या खरेदीला म्हणावा तितका अपेक्षित प्रतिसाद नाही. त्यामुळे दर स्थिर असल्याचे व्यावसायिक प्रवीण नष्टे यांनी सांगितले.
‘रेडी टू कुक’ पदार्थांना मागणी
सध्या बहुतांश महिला नोकरदार असल्याने उपवासाच्या भाजणीचे पीठ बनविण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे साबूदाण्याचे, पीठ, वरीचे पीठ, शेंगाड्याचे पीठ, राजगिऱ्याचे पीठ, उपवासाची भाजणी, थालीपीठाचे पीठ अशा ‘रेडी टू कुक’ पदार्थांना महिला वर्गाकडून अधिक मागणी आहे. याशिवाय तयार बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, बटाटा चिवडा, साबू चिवडा या तयार पदार्थांनी घराघरांत स्थान मिळविले आहे.
साहित्याचे दर असे (रु. प्रतिकिलो)
- साबूदाणा : ८४ रुपये
- वरीचे तांदूळ : १०८
- शेंगदाणे : १२०
- खजूर : १४०
- रताळे : ६०
- भुईमुगाच्या शेंगा : ८०.