लक्षण दिसताच प्रशासनास माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:47+5:302021-05-14T04:24:47+5:30
मलकापूर :कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून खासगी ...
मलकापूर :कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक आहे. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना कोरोनासदृश्य लक्षणे दिसताच तत्काळ त्यांना स्वॅब तपासणीसाठी पाठवून प्रशासनाला तत्काळ माहिती द्या, असे आवाहन बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी केले.
शाहूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
अमित माळी म्हणाले की, तालुक्यात गतवेळच्या तुलनेत यावेळचा मृत्युदर हा जास्त असून तो धोकादायक ठरत आहे. खासगी डॉक्टरदेखील त्यांच्याकडे तपासणीस आलेल्या रुग्णांची अँटिजन टेस्ट करण्यास तयार असतील तर त्यांना ही किट देण्याची व्यवस्था केली जाईल.
तहसीलदार गुरू बिराजदार यांनी अत्यावश्यक सेवेतील खासगी डॉक्टर्स, त्यांचा स्टाफ, मेडिकल दुकानदार यांचेदेखील स्राव तपासणी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. बैठकीस सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, सहायक गटविकास अधिकारी संदीप कोटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी, डॉ. स्नेहा जाधव, आदींसह सरूड, बांबवडे, मलकापूर परिसरातील खासगी वैद्यकीय डॉक्टर, शासकीय, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.