गडहिंग्लज कारखान्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:28+5:302021-03-04T04:43:28+5:30
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची मशिनरी, डिस्टिलरी व कामगार कॉलनी यांचे ...
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची मशिनरी, डिस्टिलरी व कामगार कॉलनी यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतल्याची माहिती १५ दिवसांत द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सेवानिवृत्त कामगारांनी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. श्रीपतराव शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, १९७९-८० मध्ये कारखान्याची उभारणी झाली. तेव्हापासून मशिनरी व डिस्टिलरीचे स्ट्रक्चरल ऑडिट एकदाही झालेले नाही. कारखान्याचे लोखंडी कॉलम, अँगल व कैच्या इत्यादी गंजलेल्या आहेत. बॉयलरची चिमणीदेखील सडलेली आहे. त्यामुळे काही अपघात घडल्यास त्याला कारखाना जबाबदार आहे.
तसेच कामगार कॉलनीची मोठी दुरवस्था झाली आहे. तिचीही ऑडिट व दुरुस्ती झालेली नाही. ४२ वर्षांत केवळ साखरेचा उत्पादन खर्च आणि त्याची विक्री करणे एवढेच काम कारखान्याच्या व्यवस्थापनाने केले आहे, अशी टीका पत्रकातून करण्यात आली आहे.
निवेदनावर, चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, रणजित देसाई, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, बाळासाहेब मोहिते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.