कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:13 PM2023-01-11T19:13:00+5:302023-01-11T19:13:10+5:30
प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला
उद्धव गोडसे
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर बॉम्ब असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आणि अवघ्या पंधरा मिनिटांत सर्व यंत्रणा रेल्वे स्थानकात पोहोचल्या. प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला. या सर्व प्रकाराने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली.
मात्र, हे मॉकड्रील असल्याचे कळताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला, तर सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीने अधिका-यांचा विश्वास वाढला. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेचा आढावा घेणारे मॉकड्रील बुधवारी (दि. ११) दुपारी झाले.
रेल्वेपोलिस सदा पाटील यांच्या मोबाईलवर बुधवारी दुपारी दोन वाजून ४९ मिनिटांनी अज्ञाताचा फोन आला. रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात आणि प्रतीक्षालयात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पाटील यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, एटीएस, दंगल नियंत्रण पथक, अग्निशामक दल, शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिका-यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व सुरक्षा यंत्रणा पुढील १५ मिनिटांत रेल्वे स्थानकात पोहोचल्या.
एक तास १६ मिनिटांचे मॉकड्रील
प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून बॉम्ब शोधक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने दोन्ही बॉम्बचा शोध घेतला. त्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर सुरक्षित स्थळी बॉम्ब निकामी करण्यात आले. या सर्व प्रक्रियेला एक तास १६ मिनिटांचा वेळ लागला. अखेर रेल्वे स्थानकात खरा बॉम्ब नव्हता, तर ते सुरक्षा यंत्रणांचे मॉक ड्रील असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आणि प्रवाशांची जीव भांड्यात पडला. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.