चित्रपट महामंडळाच्या सभासदांची माहिती आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 03:31 PM2019-01-24T15:31:45+5:302019-01-24T15:38:30+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन वर्षात वाढलेले सभासद आणि खर्चाचे योग्य नियोजन यामुळे महामंडळाच्या एकूण तब्बल आठ कोटींच्या ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन वर्षात वाढलेले सभासद आणि खर्चाचे योग्य नियोजन यामुळे महामंडळाच्या एकूण तब्बल आठ कोटींच्या ठेवी असल्याचेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची तीन वर्षांची एकत्रित सभा रविवारी (दि.२७) मार्केट यार्ड येथील सांस्कृतिक भवनमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षातील कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळे ही देशातील सर्वात मोठी चित्रपट व्यावसायिकांची संघटना असून सभासदांची माहिती आॅनलाईन पाहता येणार आहे. सध्या १८ हजार सभासदांची माहिती यात फिड असून उर्वरीत कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे.
महामंडळातर्फे सध्या ७८ कलाकारांना १ हजार रुपये मानधन दिले जात असून हा लाभ हयात असेपर्यंंत मिळणार आहे. ही संख्या ५००वर नेण्याची इच्छा असून त्यासाठी दीड कोटींची तरतुद असून दरवर्षी १० लाखांनी वाढ करण्यात येणार आहे. महामंडळाच्या मागणीनंतर शासनाने चित्रनगरीचे भाडे दर कमी केले असून दुसऱ्या टप््यासाटी सुकाणु समिती नियुक्त केली आहे.
कोल्हापुरातील प्रभात तुतारी व कॅमेरा स्तंभाचे पर्यटनस्थळ होण्याच्या दृष्टीने नुतनीकरण व देखभाल करण्यात येणार आहे. त्यासाठी १० लाखांची तरतुद केली आहे. मुंबईत भूमिका करण्यासाठी आलेल्या स्त्री व पुरुष कलाकारांना राहण्यासाठी दोन स्वतंत्र फ्लॅट भाड्याने घेण्यात आले आहेत.
परिषदेस उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह बाळा जाधव, सतिश बिडकर, संजय ठुबे, अॅड. प्रशांत पाटील, अॅड, मंदार जोशी, अरुण चोपदार, अर्जून नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, रविंद्र बोरगांवकर आदी उपस्थित होते.
महामंडळ वितरणात उतरणार...
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीत त्यामुळे चित्रपट महामंडळ स्वत: चित्रपटाच्या वितरणात उतरणार आहे. या शिवाय बस्थानक व तालुक्याच्या ठिकाणी शंभर ते दोनशे प्रेक्षक संख्येनुसार मिनिप्लेक्स सुरु करण्यात यावे अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. हे मिनीप्लेक्स चालवण्यासाठी महामंडळ तयार आहे.
कोल्हापुरचे कार्यालय होणार अद्ययावत
कोल्हापुर हे महामंडळाचे मुख्य कार्यालय असल्याने ते नव्या जागेत अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असावे असे संचालक मंडळाचे मत आहे. त्यासाठी स्वतंत्र जागा खरेदी अथवा भाडेतत्वावर घेवून तेथे नवे कार्यालय उभारण्याचा विचार असून हा विषय सभेत प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे.
महामंडळाने केलेली कामे
१) २०१८ सालात १ कोटी ३४ लाख ९९ हजारांचा नफा
२) शासनाकडे थकित असलेल्या १६ कोटींच्या अनुदानापैकी १० कोटींचे अनुदान निर्मात्यांच्या खात्यात
३) चित्रीकरणासंबंधी महसूल विभागाच्या अटी शिथील
४) १ कोटींपेक्षा जास्त नफा असलेल्या चित्रपटांना अनुदान नाही
५) निर्मात्यासांठी कार्यशाळा
६) सातारा, औरंगाबाद, बीड, नागपूर येथे शाखा विस्तार
७) तीन वर्षात सभासद संख्येत वीस हजारांनी वाढ
८) बोगस आॅडीशन, शॉर्ट फिल्म फेस्टिवलची दुकानदारी रोखली
९) नवीन घटनेत दुरचित्रवाणीचाही समावेश
१०) मराठी चित्रपटांना जीएसटीत सवलत
सभासद संख्या
अ वर्ग सभासद : १९ ५३८
ब वर्ग सभासद : १४, ९३९
आजीव सभासद : १ हजार २३३
सन्माननीय सभासद : १२१