कोल्हापूर : जोतिबा यात्रा कडेकोट बंदोबस्त, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:28 PM2018-03-27T18:28:30+5:302018-03-27T18:28:30+5:30
जोतिबा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. परजिल्ह्यांतून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी दिली.
कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देऊन भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्यात आली आहे. परजिल्ह्यांतून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी दिली.
|जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक माहिते यांनी सोमवारी (दि. २६) जोतिबा मंदिर परिसराची पाहणी केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. सासनकाठ्या व पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मंदिर परिसर व सेंट्रल प्लाझा या दोन्ही स्थळांची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले.
दरम्यान, शुक्रवार (दि. ३०) आणि शनिवार (दि. ३१) या यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांची उपस्थिती असते. अशावेळी दर्शनरांगेत चेंगराचेंगरी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोतिबा परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दुचाकींसह चारचाकी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून भाविकांना डोंगरावर जाण्यासाठी स्कूल बसेसचे नियोजन केले आहे.
जादा बसेससाठी महापालिकेच्या ‘के.एम.टी.’कडे मागणी केली आहे. संपूर्ण जोतिबा परिसरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हालचालींवर पोलिसांचे विशेष पथक नजर ठेवून असणार आहे. भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी भाविकांनी डोंगरावर ये-जा करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
खासगी वाहनांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनी भाविकांना डोंगरावर सोडून आपली वाहने पन्हाळा डोंगरावरील उपलब्ध पार्किंग, केर्ली गावातील माळरान व हायस्कूल मैदान तसेच रजपूतवाडी-सोनतळी मैदान आदी ठिकाणी पार्किंग करावी. भाविकांनी व वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक माहिते यांनी केले आहे.
यात्रेकरूंसाठी पार्किंगची व्यवस्था
यात्रेकरीता जाणारी सर्व वाहने केर्ली व कुशिरे फाटामार्गे जोतिबा डोंगरावर जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. केर्ली-कुशिरे गावावरून येणारी सर्व मोटार वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखामार्गे जोतिबावर जातील. सर्व एस. टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील.
घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ किंवा गिरोलीमार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एक दिशामार्गे जातील. जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी राहील. देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील ‘एक दिशा मार्गा’चा अवलंब करावा.
वाघबीळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यामार्गे वाहनांना जोतिबावर जाण्यास प्रवेश बंदी आहे.
अवजड वाहनांना ‘प्रवेश बंदी’
अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टर यांना यात्रा कालावधीत जोतिबावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पोलीसांना सहकार्य करा
यात्रा काळात राज्यातून व परराज्यांतून लाखो भाविक खासगी व सार्वजनिक वाहनांनी डोंगरावर येत असतात. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर यात्रेच्या काळात घाटामध्ये अत्यावश्यक वाहनांना वगळून एकेरी वाहतूक, मोटार वाहनांना प्रवेश बंदी, मार्ग वळविणे, नो पार्किंग, हॉल्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. वाहनचालक व भाविकांनी वाहतूक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.
असा असेल बंदोबस्त
पोलीस अधीक्षक : १
अप्पर पोलिस अधीक्षक : १
पोलिस उपअधीक्षक : ६
पोलिस निरीक्षक : १९
पोलिस उपनिरीक्षक : ७३
वाहतूक पोलिस : ४०
पोलिस शिपाई : ८००