‘मन की बात’द्वारे भाजपने दिली मोदींच्या कार्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 02:08 PM2019-08-26T14:08:57+5:302019-08-26T14:12:19+5:30
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘ मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील ...
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा ‘मन की बात’ कार्यक्रम रविवारी झाला. भाजपतर्फे शहरातील सात मंडलांमध्ये हा कार्यक्रम घेऊन पंतप्रधान मोदी यांच्या कार्यासह ते राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. ११ सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा हे अभियान प्रत्येक प्रभागांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घ्यावे, असे आवाहन महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यावेळी केले.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम होत असतो. त्यानुसार भाजपतर्फे शहरातील शिवाजी पेठ येथे नेसरीकर वाडा, मंगळवार पेठ येथे सणगर गल्ली तालीम, उत्तरेश्वर पेठ येथे रेगे तिकटी, शाहूपुरी येथे शाहूपुरी तालीम, राजारामपुरी मंडलमध्ये करवीर प्रशाला विक्रमनगर, लक्ष्मीपुरी मंडल येथे भाजपा कार्यालय आणि कसबा बावडा येथे लाईन बाजार चौक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या ठिकाणी चिकोडे यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांची १५० वी जयंती होत असून, यानिमित्ताने ११ सप्टेंबरपासून प्रत्येकाने वैयक्तिक सहभागाने करावयाचे स्वच्छता अभियान, संपूर्ण प्लास्टिक मुक्ती संकल्प, वन्यजीव संवर्धन कार्यक्रम आणि राष्ट्रीय खेल दिवसपासून सुरू होणाऱ्या हेल्दी इंडिया अभियानाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी दिली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, मारुती भागोजी, राजाराम शिपुगडे, मामा कोळवणकर, संतोष माळी, भरत काळे, चंद्रकांत घाटगे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, प्रभा इनामदार, आप्पा लाड, नचिकेत भुर्के , विजय आगरवाल, हेमंत कांदेकर, आदी उपस्थित होते.