नागरी बँकांमधील लॉकर्सची माहिती आता ऑनलाइन, रिझर्व्ह बँकेचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:17 PM2022-02-03T14:17:20+5:302022-02-03T14:18:22+5:30
वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक दागदागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू घरात ठेवण्याऐवजी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवणे अधिक पसंत करत आहेत
राजाराम लोंढे
कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे नागरी सहकारी बॅकांमधील लॉकर्सची माहिती आता ग्राहकांसाठी ऑनलाइन जाहीर करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. त्याचबरोबर लॉकर्स मिळावे म्हणून बँकांकडे प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांची यादीही जाहीर करणे बंधनकारक राहणार आहे. नवीन नियमाची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचनाही बँकांना दिली आहे.
वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक दागदागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू घरात ठेवण्याऐवजी बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवणे अधिक पसंत करत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच नागरी बँकांनाही त्यांच्याकडील लॉकर्सची संख्या, त्यातील कितींचा वापर झाला, मोकळे किती, याची माहिती खुली करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर कोणत्या बँकेची लॉकर्स मोकळी आहेत, याची माहिती तातडीने मिळणार आहे.
लॉकर्सला पुराचाही फटका
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत जुलैमध्ये आलेल्या महापुरातून बँकांचे लॉकर्सही सुटलेले नाहीत. लॉकर्स पाण्याखाली गेल्याने दोन्ही जिल्ह्यांतील बँकांंच्या कोट्यावधींच्या नोटा खराब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाऊस व पुरापासून सुरक्षित लॉकर्सची बांधणी करण्याच्या सूचनाही रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत.
लॉकर्सच्या भाड्याला बँकांना मोकळीक
लॉकर्सचे भाडे किती असावे, याबाबत बँकांना मोकळीक दिली आहे. नागरी बँकांच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या लॉकर्सचे भाडे दुप्पट आहे.
लॉकर्सबाबत या राहणार नियमावली-
- लॉकर उघडल्यावर संबंधित व्यक्तीला मेसेज जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत व्यवहार टाळता येणार आहे.
- लॉकरमध्ये वस्तू ठेवताना संबंधित व्यक्तीने वारस देणे बंधनकारक राहणार.
- न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच ‘ईडी’सह इतर राष्ट्रीय तपास यंत्रणांना लॉकर्स उघडता येणार.
- लॉकर्सचे भाडे थकले, तर त्याचा ताबा आपोआपच बँकेकडे जाणार.
...असे आहेत लॉकर्सचे वार्षिक भाडे
लहान - ५००
मध्यम - ८००
मोठे - १,२००
लॉकर्सबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार गेल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. यामुळे बँकिंग यंत्रणेला एक शिस्त लागण्यास मदत होईल. - संजयकुमार मगदूम (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षक बँक)