जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे स्त्रियांच्या गर्भधारणेवर परिणाम : पद्मरेखा जिरगे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:46 AM2018-06-15T00:46:02+5:302018-06-15T00:46:02+5:30
स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यांचे हे संशोधन इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या ‘ह्युमन रिप्रॉडक्शन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले असून, त्यामुळे या संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असल्याची माहिती डॉ. जिरगे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जगात आतापर्यंत वंध्यत्वास कारणीभूत ठरणाºया क्षयरोगाचे स्त्रीबीजांवरील विपरीत परिणाम तपासणारे संशोधन झालेले नाही. ते कोल्हापुरात झाल्याने जगाच्या वैद्यकीय पटलावर कोल्हापूरचे नाव पुन्हा झळकले आहे.
डॉ. जिरगे यांनी २० ते ३८ वयोगटातील ८१५ स्त्रियांवर गेली पाच वर्षे हे संशोधन केले असून, त्यांपैकी ३९५ (४८ टक्के) स्त्रियांच्या जननेंद्रियास क्षयरोग असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या अंडाशयामध्ये स्त्रीबीजांची संख्या कमी होत होती. त्यामुळे अंडाशयाची कार्यक्षमता व गर्भधारणेची शक्यताही कमी होते. अशा स्त्रियांवर क्षयरोगाचे योग्य उपचार झाल्यास स्त्रीबीजांची कार्यक्षमता व गर्भधारणेची क्षमता वाढते. क्षयरोगाच्या योग्य उपचारानंतर त्यातील २५ टक्के स्त्रियांमध्ये सर्वसामान्य उपचारांमध्ये गर्भधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जिरगे यांनी हे संशोधन गर्भधारणातज्ज्ञ श्रुती चौगुले, फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अजय केणी व बंगलोरच्या डॉ. सुमा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. दीपक मोदी व सांगलीच्या भारती विद्यापीठातील सांख्यिकी तज्ज्ञ विवेक वाक्चौरे यांच्या सहकार्याने केले. डॉ. जिरगे म्हणाल्या, आतापर्यंत क्षयरोग व वंध्यत्व यासंबंधी जगात कुठेच संशोधन झालेले नव्हते. आमच्याकडे ज्या स्त्रिया वंध्यत्वाच्या उपचारासाठी येत, त्यांचे वय ३० ते ३२ असतानाही स्त्रीबीजांचे प्रमाण त्यांच्यामध्ये का कमी आहे याचा आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली. स्त्रीबीजांचे प्रमाण कमी झाले तर ते वाढविता येत नाही व ते कमी व्हायचे थांबवताही येत नाही. विविध चाचण्या करून संशोधन केले असता स्त्रियांमध्ये जननेंद्रियांमध्ये सुप्त अवस्थेत क्षयरोगाचे जंतू असल्याचे आढळले. मग स्वतंत्रपणे फुप्फुसरोगतज्ज्ञांच्या मदतीने क्षयरोगावरील सहा महिन्यांचे उपचार सुरू केल्यानंतर त्यांतील २५ टक्के स्त्रियांना पहिल्या दोन महिन्यांतच गर्भधारणा यशस्वी झाली.’ पत्रकार परिषदेला डॉ. शिशिर जिरगे, श्रुती चौगुले हे उपस्थित होते.
जगाला उपयुक्त संशोधन
भारतासह चीन, आफ्रिकन देश, उत्तर अमेरिका या देशांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे. शिवाय येथील नागरिकांना कमी वयात मधुमेह, वाढलेले वजन या समस्या आहेत. त्यांचाही वंध्यत्वावर परिणाम होतो. नव्या संशोधनाचा या देशांसह साºया जगालाच उपयोग होणार असल्याची माहिती डॉ. जिरगे यांनी दिली.
गौरवास्पद संशोधन
‘ह्युमन रिप्रॉडक्शन’ या नियतकालिकामध्ये एखादा शोधनिबंध प्रसिद्ध होणे याला जगाच्या पाठीवर फारच वेगळे महत्त्व आहे. भारतातील संशोधकांचे त्यामध्ये लेख प्रसिद्ध होण्याचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आहे. अशा नियतकालिकामध्ये कोल्हापूरच्या डॉक्टरच्या संशोधनाचा विचार होणे ही बाबही गौरवास्पद आहे. या संशोधनासाठी डॉ. जिरगे यांना बंगलोरच्या राष्ट्रीय क्षयरोग निदान संस्थे (एनआयटीबीसी)चीही मदत झाली.