इंगळी ग्रामपंचायतीकडून 'ग्राम सुरक्षा कवच' अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:13+5:302021-05-15T04:23:13+5:30
प्रवीण कदम लोकमत न्यूज नेटवर्क इंगळी : आपत्कालीन परिस्थितीत सर्व ग्रामस्थांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सतर्क करण्यासाठी 'ग्राम सुरक्षा कवच' ...
प्रवीण कदम लोकमत न्यूज नेटवर्क
इंगळी : आपत्कालीन परिस्थितीत सर्व ग्रामस्थांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सतर्क करण्यासाठी 'ग्राम सुरक्षा कवच' हा अभिनव उपक्रम येथील ग्रामपंचायतीने कार्यान्वित केला आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी इंगळी ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामसुरक्षेचा नवीन प्रयोग येथे राबविण्यात येत आहे.
या सुरक्षा प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी सर्व ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या सर्वांना सतर्क केले जाते. यासाठी १८००२७०३६०० हा टोल फ्री क्रमांक असून, या क्रमांकावर निर्धारित २५ सेकंदांत कोणत्याही घटनेची माहिती वा सूचना देण्यात येते. याद्वारे सर्व संबंधित यंत्रणांना क्षणार्धात घटनेची माहिती मिळते व परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था आहे.
कोरेगाव-भीमा बंदोबस्त, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात या यंत्रणेचा वापर प्रभावी ठरला आहे. पुणे ग्रामीण, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही यंत्रणा यशस्वी ठरली आहे. डीव्हीजी सिक्युरिटी सर्व्हिसेस, हुपरी व ग्रा.सु. संचालक डी. के. गोर्डै यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला असून, जिल्ह्यामध्ये इंगळी ग्रामपंचायतीने तो पहिल्यांदा कार्यान्वित केला आहे. याद्वारे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, १७०० ग्रामसुरक्षा रक्षक, जिल्हा पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग एका कॉलवर जोडले गेले आहेत. सरपंच शालन पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्मिता शेंडुरे, पंचायत समिती सदस्या वैजयंती आंबी, ग्रामसेवक बजरंग सूर्यवंशी यांनी या ग्रामसुरक्षा यंत्रणेची सुरुवात केली व खासदार धैर्यशील माने यांनी याद्वारे ग्रामस्थांना उद्देशून पहिला संदेश दिला.
चौकट
यंत्रणेचा वापर फायदेशीर
पूरपरिस्थिती, चोरी, रस्ते अपघात, महिला छेडछाड, दंगल या परिस्थितीत या यंत्रणेचा वापर निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. हुपरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये कार्यान्वित करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले.