शीळ गाण्यातून प्रबोधनाचा वारसा देणारे - लोककलावंत : गोविंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:04 AM2021-02-20T05:04:47+5:302021-02-20T05:04:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : निसर्गाचंच देणं लाभलेली शीळ... शिट्टीतून साकार होणारं शीळ गाणं... यातून नव्या पिढीला ऊर्जा देणारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : निसर्गाचंच देणं लाभलेली शीळ... शिट्टीतून साकार होणारं शीळ गाणं... यातून नव्या पिढीला ऊर्जा देणारे कोनवडे (ता. भुदरगड) येथील गोविंद केरबा पाटील (सर) यांनी महाराष्ट्राला शीळ गाण्यातून वेड लावलं आहे. शिट्टी व शीळ गाणं या कार्यशाळामधून लोककला जतन करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे.
गोविंद पाटील हे विद्यामंदिर टिक्केवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
आज रानावनात, प्रत्येक ऋतूंत अनेक प्रकारचे पक्षी शीळ घालतात. त्यांची शिट्टी, शीळची भाषा त्यांनी अवगत केली आहे. शीळ गीत एक प्रकारे लोककला आहे. तिचे जतन व
संवर्धन त्यांनी केले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर whistle songs lovers नावाचा ग्रुप त्यांनी सुरू केला आहे. govind's whistle नावाचे त्यांचे यू ट्यूब चॅनेल सुरू आहे. सध्या या चॅनेलचे १.१२ हजार सबस्क्राईबर आहेत. यावर तुम्हाला नवनवीन शिट्टीवरची गाणी ऐकायला मिळतात. अजूनही डोंगराळ व दुर्गम भागात राहणारे लोक (हिमाचल, अरुणाचल) शिट्टीचा व शीळचा उपयोग करून निरोप देतात -घेतात. लहानपणी शिट्टी घालायला शिकलेले गोविंद पाटील यांनी स्वरयंत्राच्या हालचालींमधून कानाला गोड लागणारी व हृदयापर्यंत पोहोचणारी शिळगाणी स्वरबद्ध केली आहेत. शीळ गाण्याच्या नजाकतीमुळे संगीताचं ज्ञान असेल तर हे कौशल्य कमावणं सहजशक्य आहे. यासाठी सरावाची गरज आहे.
चौकट:
गोविंद पाटील या ध्येयवेड्या शिक्षकांची गावकीर्तन, उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता, धूळधाण (कविता) संग्रह प्रसिध्द आहेत. कविता संग्रहांना विविध पंधरा पुरस्कार मिळाले आहेत. कविता वाचन स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळालेली आहेत.
चौकट:
शिट्टीतून सर्व भाषेतली गाणी
कराओके ट्रॅकवर मी हिंदी आणि मराठी गाणी वाजवतो... शिट्टी हा फुफ्फुसांचा व्यायाम आहे. तुम्हाला मानसिकदृष्ट्या तणावरहित व्हायचं असेल, तर शिट्टीसारखं दुसरं औषध नाही. शिट्टीमुळं आनंद मिळतो. आता तर शीळगाण्यांचे ऑर्केस्ट्राज होताहेत. शिट्टीच्या कार्यशाळाही होत आहेत. वेगळ्या प्रकारची कला म्हणून नव्या पिढीला याचं अप्रूप आहे.
- गोविंद पाटील (प्राथमिक शिक्षक), कोनवडे, ता भुदरगड
फोटो;शीळ गाणं. गोविंद पाटील