ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:16+5:302021-02-08T04:21:16+5:30

जयसिंगपूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री हसन ...

Initiate Gram Sabha of Gram Panchayat immediately | ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा तातडीने सुरू करा

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा तातडीने सुरू करा

Next

जयसिंगपूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन रविवारी शेट्टी यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिले.

शेट्टी म्हणाले, राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्वत्र लॉकडाऊन खुले झाले असून जवळपास सर्वच कार्यक्रम सुरू आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, लग्न आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शाळा, कॉलेजना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ग्रामपंचायतींना अद्यापही ग्रामसभा तसेच मासिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत लाखो शेतकरी कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अजिबात दाद दिलेली नाही. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. सर्वच ग्रामपंचायतींना या कायद्याच्या विरोधात ठराव करायचे आहेत. त्यामुळे याची दाहकता केंद्र सरकारपर्यंत जाईल. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू आहे. गावातील अनेक निर्णय प्रलंबित आहेत. त्यासाठी राज्यातील ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे.

सध्या राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा, जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सभा, विविध पक्षांचे संपर्क दौरे, थिएटर या गोष्टींना परवानगी दिलेली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे त्वरित मागे घेण्यासाठी शेतकरी ठराव करून आपल्या भावना राष्ट्रपतींकडे पाठविणार असल्याचेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी गिरीश फोंडे, कॉ. नामदेव गावडे, बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, दीपक हेगडे, प्रभू भोजे, सागर कोंडेकर, अविनाश मगदूम उपस्थित होते.

फोटो - ०७०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ -

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन माजी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

Web Title: Initiate Gram Sabha of Gram Panchayat immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.