आसुर्लेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:31 AM2020-02-25T11:31:19+5:302020-02-25T11:33:45+5:30
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले (ता. पन्हाळा) व हेर्ले (ता. हातकणंगले) येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सोमवारी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या चार दिवसांत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आसुर्ले (ता. पन्हाळा) व हेर्ले (ता. हातकणंगले) येथे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते सोमवारी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार ६१८ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या चार दिवसांत उपलब्ध होतील, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.
आसुर्ले येथील ११६ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध आहे. भैरव विकास संस्थेत झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आधार प्रमाणिकरणाचा प्रारंभ करत शेतकऱ्यांना पोहोच पावत्यांचे वितरणही केले. पात्र याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरांवर निर्गत केल्या जातील.
उर्वरित याद्या शुक्रवार (दि. २८)पर्यंत येणार असून या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास संस्था तसेच जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील, असे देसाई यांनी सांगितले. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी या योजनेची सविस्तर माहिती दिली. सरपंच भगवान पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, भैरव संस्थेचे अध्यक्ष संपतराव पाटील, सहाय्यक निबंधक शिरीष तळकेरी, उपसरपंच संभाजी पाटील, अशोक जाधव, संतोष धुमाळ आदी उपस्थित होते.
जिल्ह्यासाठी ३७२ कोटी मिळणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत ५० हजार ६१८ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांच्या कर्जखात्यावर ३७२ कोटी वर्ग करून ते कर्जमुक्त होणार आहेत.
कर्जमुक्तीबद्दल शेतकऱ्यांकडून समाधान
कर्जमुक्ती आधार प्रमाणिकरणानंतर, शेतकरी बाबासाहेब जाधव, खंडू पाटील व रेखा कुंडलिक दुगुले यांनी समाधान व्यक्त केले.