कोल्हापूर जिल्ह्यातील १४ शाळांच्या कार्निव्हलला प्रारंभ, नवविचार, निर्मितीच्या आविष्काराला उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 06:51 PM2017-12-09T18:51:22+5:302017-12-09T18:54:17+5:30
नेल आर्ट, टाकाऊतून टिकाऊ, मिक्स्ड कोलाज, नववधूचा मेकअप, स्मार्ट सिटी, शाळांमध्ये सीसीटीव्हीची गरज अशा विषयांवर वादविवाद अशा विविधांगी कलाविष्कारांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या नवविचार व निर्मितीच्या संकल्पांचे परीघ वाढविणाऱ्या ‘कार्निव्हल’ला शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
कोल्हापूर : नेल आर्ट, टाकाऊतून टिकाऊ, मिक्स्ड कोलाज, नववधूचा मेकअप, स्मार्ट सिटी, शाळांमध्ये सीसीटीव्हीची गरज अशा विषयांवर वादविवाद अशा विविधांगी कलाविष्कारांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या नवविचार व निर्मितीच्या संकल्पांचे परीघ वाढविणाऱ्या ‘कार्निव्हल’ला शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
न्यू पॅलेसमधील छत्रपती शाहू विद्यालयाच्या वतीने आयोजित या कार्निव्हलचे उद्घाटन फुटबॉलपटू सपनाराणी व जर्मन खेळाडू अंजा यांच्या हस्ते झाले. यावेळी शाहू महाराज, याज्ञसेनीराजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, संचालिका राजश्री पाटील, प्राचार्या पद्मा मुंगरवाडी, सीबीएसई विभागाच्या शीतल पवार उपस्थित होत्या.
यावेळी सपनाराणी म्हणाल्या, कोल्हापूरकरांची फुटबॉलप्रती असलेली आवड आणि प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. कोल्हापूरमध्ये खूप क्षमता व कौशल्य असून त्याद्वारे अनिकेत जाधवसारखे अनेक खेळाडू तयार होतील व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
उद्घाटनाच्या सत्रानंतर कार्निव्हलमधील विविध स्पर्धांना सुरुवात झाली. एकीकडे विद्यार्थी आपल्या नखांवर सुरेख नक्षीकाम करीत होते. दुसऱ्या विभागात पुठ्ठे, पेपर, स्पंज, वापरलेले सॉक्स, खराब झालेल्या सीडी, कपडे, गिफ्ट रॅपर, कागदी प्लेट, प्लास्टिकचे ग्लास अशा टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्यात मुले कौशल्य पणाला लावत होती. आणखी एका दालनात नववधूचा सुंदर मेकअप सुरू होता.
मिक्स कोलाज या पद्धतीत कागदावर डाळींपासून, धान्याच्या साली, काड्यापेटीच्या काड्या, कापूस, कागदाचे तुकडे, पाना-फुलांच्या साहाय्याने सुरेख चित्र साकारण्यात आले. मुख्य हॉलमध्ये वेगवेगळ्या विषयांवर दोन संघांमध्ये वादविवाद सुरू होता. हा सगळा उत्सव पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्पर्धकांचे मनोबल वाढवीत होती. त्यांच्या धम्माल मस्तीने या कार्निव्हलमध्ये उत्साहाचे रंग भरले. या कार्निव्हलमध्ये जिल्ह्यातील १४ शाळांमधील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सायंकाळी स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले.
कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांच्या स्पर्धा
चक्रव्यूह (प्रश्नमंजूषा), तराणा (गायन), पुष्परचना, मास्टर शेफ, टाईल पेंटिंग, व्रेथ मेकिंग, अॅड बोनान्झा, डुडस अॅँड डॉल्स, द बोल्ड अॅँड द ब्यूटी, समूहनृत्य.
खुल्या स्पर्धा
सुगम संगीत, कुकिंग, पुष्परचना, व्रेथ पेंटिंग, टाईल पेंटिंग, बेस्ट ड्रेस्ड