कोल्हापुरात ‘शिक्षणाची वारी’ला प्रारंभ, तावडे यांनी साधला मुंबईतून संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 04:47 PM2018-12-10T16:47:45+5:302018-12-10T16:56:26+5:30
देशाचे भवितव्य घडवणाऱ्यांनी केवळ ११ ते ५ पेक्षा अधिक वेळ देण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
कोल्हापूर : देशाचे भवितव्य घडवणाऱ्यांनी केवळ ११ ते ५ पेक्षा अधिक वेळ देण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
शिक्षण विभागाच्या ‘शिक्षणाची वारी’ उपक्रमाच्या प्रारंभावेळी तावडे यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
तावडे म्हणाले, ‘पंढरपूरच्या वारी’तून पांडुरंगाचा आशीर्वाद मिळतो तसाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आशीर्वाद विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी ही वारी आयोजित केली आहे.
सन २०१४ मध्ये मी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले. शिक्षणमंत्री हा पहिल्यांदा विद्यार्थ्यांसाठी असतो नंतर शिक्षकांसाठी, अशी माझी भूमिका आहे. मात्र, यामुळेच काही संघटनांनी गैरसमज पसरवले.
तावडे यांनी सातवा वेतन आयोग आणि अनुदान हे विषय वगळून प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. या प्रश्नांना उत्तरे देताना तावडे म्हणाले, पाचवीला शिष्यवृत्ती ठेवल्याने जिल्हा परिषदेचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकत नाहीत. ही संख्या घटली आहे. हे लक्षात आले आहे. त्यामुळेच यातून मार्ग काढू.
खासगी शाळा सुरू झाल्या तरी मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत आली पाहिजेत. सध्या शिक्षण क्षेत्रावर महाराष्ट्रात ५८ हजारांची गुंतवणूक करण्यात आली असून यामध्ये आणखी वाढ करू; परंतु याचा गुणवत्तेच्या रूपाने परतावा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
बदल्यांच्या प्रश्नांबाबत तावडे म्हणाले, ९३ टक्के शिक्षकांच्या स्वेच्छा बदल्या झाल्या आहेत तसेच जर राजकारणातून शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीमध्ये संघर्ष होत असेल तर मी संबंधितांशी बोलेन.
शिक्षकांची निवडणूकविषयक कामे कमी करण्याबाबत मुख्यमंत्री आणि मी निवडणूक आयुक्तांना भेटलो आहे, पुन्हा प्रयत्न करू. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनीही शिक्षकांना त्यांच्या या कामामध्ये सहकार्य करावे.
आपल्या संवादामध्ये तावडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक आणि शिक्षण सभापती अमरीश घाटगे यांचा आवर्जून उल्लेख केला.
शिक्षणमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी विद्या साठे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरिश घाटगे , विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी भाषणे केली.
प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांनी आभार मानले.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ डी. बी पाटील, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील, एससीईआरटीच्या उपसंचालक डॉ. शोभा खंदारे, विभागीय सचिव टी. एल. मोळे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, किरण लोहार, नीशादेवी वाघमोडे, बी. एम. कासार, प्राचार्य ए. पी. पाटील, सुशील शिवलकर उपस्थित होते.
शाहीर आझाद नाईकवडी यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आकाराम ओंबासे, विकास पवार (सातारा), नारायण आयरे (येळवडे. ता. राधानगरी), अर्चना कुलकर्णी (चंद्रपूर ), दीपाली भोईटे (करवीर), लता पाटील (हातकणंगले)
आदर्श शालेय व्यवस्थापन समितीला पुरस्कार
शिक्षकांप्रमाणेच आदर्श १० शालेय व्यवस्थापन समित्यांना आपल्याला पुरस्कार देता येतील का याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी सूचना तावडे यांनी यावेळी केली. विकास पवार (सातारा)यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
सात जिल्ह्यांतील ५२ स्टॉल्स
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर या सात जिल्ह्यांतील ५२ स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. यामध्ये आपापल्या शाळेमध्ये शिक्षकांनी केलेल्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे दर्शन या स्टॉल्समधून घडत आहे.
कोल्हापूर येथे ‘शिक्षणाची वारी’चे उद्घाटन विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ. शोभा खंदारे, प्राची साठे, किरण लोहार, सुभाष चौगुले, अंबरीश घाटगे, दिनकर पाटील, डॉ. आय. सी. शेख उपस्थित होते. यावेळी सात जिल्ह्यांतील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.................................
(बातमीदार-समीर देशपांडे)