अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी श्रीपूजकांचाच पुढाकार
By Admin | Published: June 3, 2017 03:00 PM2017-06-03T15:00:32+5:302017-06-03T15:00:32+5:30
बदनामीचे षडयंत्र , श्रीपूजकांनी मांडली भूमिका
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0३ : अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम श्रीपूजकांनी पुढाकार घेतला आहे. अभिषेक बंद पासून आर्द्रता नियंत्रणात आणण्यापर्यंतच्या उपाययोजना केल्या आहेत. असे असताना केवळ द्वेषातून श्रीपूजक अंबाबाई मूर्तीची काळजी घेत नाहीत, पावित्र्य राखत नाही असे आरोप केले जात आहे. श्रीपूजकांची नाहक बदनामी करणाऱ्या घटकांवर योग्य ती कारवाई करु असा इशारा श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आला.
अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि झीज या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी पुरातत्वचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी मूर्ती अंतर्गतरित्या सुस्थितीत असून पांढगे डाग घालवून झीज रोखण्यासाठी पून्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल असा निर्वाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर, अॅड. केदार मुनिश्वर, नगरसेवक अजित ठाणेकर, शिरीष मुनिश्वर यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर केली.
ते म्हणाले, श्रीपूजक, देवस्थान समिती आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अंबाबाई मूर्तीवर २०१५ मध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. गेल्या दोन वर्षात त्यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसात श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, आर्द्रतेचे नियम अमलात आणत नाही असे आरोप करण्यात आले. मात्र मिश्रा यांच्यामुळेच त्यावर उत्तर मिळाले आहे. मूर्तीची झीज थांबवण्यासाठी श्रीपूजकांनीच १९७० साली व पुढे १९९७ साली अभिषेक पूर्णत: बंद केले. आर्द्रता नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातील अनेक बाबी देवस्थान समितीच्या अखत्यारित आहे. त्या सगळ््यांची तातडीने पुर्तता करणे, फरशा काढणे, भिंतींवरील रंग काढणे यासाठी काही कालावधी लागणार आहे.
सिंगना परवानगी साठेंकडूनच..
निवृत्त झालेल्या मनेजन सिंगना श्रीपूजकांनी मूर्तीला हात कसे लावू दिले? या प्रश्नावर केदार मुनिश्वर म्हणाले, सिंग खाजगी दौऱ्यासाठी जात असताना कोल्हापूरात आले. यावेळी त्यांनी मी सोबत संवर्धनाचे साहित्य आणले आहे मूर्तीवर थर देवू का असे विचारले असता माधव मुनिश्वरनी त्यांना नकार दिला व देवस्थानकडे परवानगी घ्या असे सांगितले. त्यानंतर सिंगनी दोन तास देवस्थानच्या कार्यालयात तत्कालिन सचिव शुभांगी साठे यांच्याशी चर्चा केली आणि साठेंनीच त्यांना परवानगी दिल्यानंतर आम्ही हे काम करु दिले. तेंव्हा आम्हाला ते निवृत्त झाले होते हे माहित नव्हते. मात्र त्यांनी ही बाब सदस्यांना व प्रशासनाला का सांगितली नाही हे आम्हाला माहित नाही.
खाडेंच्या हकालपट्टीची मागणी करणार
यावेळी अजित ठाणेकर म्हणाले, दान पेटी वगळता देवस्थान आणि श्रीपूजकांमध्ये कोणतेही वाद नाहीत. देवस्थान समितीवर दोनवेळा सदस्य म्हणून गेलेल्या संगीता खाडे यांच्या चूकीच्या वागण्यामुळेच पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना बाजूला ठेवले होते. आता त्यांनी हीन शब्दात श्रीपूजकांबद्दल बेजबाबदार वक्तव्ये करून समाजात क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची देवस्थान सदस्य पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे.
नागचिन्हाबाबत सकारात्मकच
नागचिन्ह घडवू नये साठी पूजाऱ्यांनी आमच्यावर दबाव टाकला होता असा आरोप सिंग यांनी केला होता, त्यावर ते म्हणाले, आम्ही व मूर्तीअभ्यासकांनीही सगळे संदर्भ, छायाचित्रे दिली होती. मॉडेल म्हणून एका कलाकाराने घडवलेली मूर्तीही ते पाहून आले. तरी त्यांनी नागचिन्ह का घडवला नाही हे आम्हाला माहित नाही. त्यानंतर आम्ही नागचिन्हाबाबत समिती घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र प्रशासनाने त्यावर कमिटीच नेमली नाही.