कोल्हापूर : पंचगंगा घाट संवर्धन समितीचा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 05:07 PM2018-09-08T17:07:04+5:302018-09-08T17:10:14+5:30
कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत.
कोल्हापूर : येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत.
विशेष म्हणजे विसर्जनासाठी जी कुंडे ठेवण्यात येणार आहेत, त्यांमध्ये चारधाम यात्रांच्या नदीपात्रातील पाणी टाकले जाणार असल्याने अशा पवित्र पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे भाग्य कोल्हापूरकरांना मिळणार आहे.
पंचगंगा घाट संवर्धन समितीचे अध्यक्ष सुमित वैद्य, उपायुक्त प्रमोद पुंगावकर, सचिव संजय आमुस्कर, खजानिस अमित सूर्यवंशी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत समितीच्या उपक्रमाची माहिती सांगितली.
पर्यावरणपूक गणेश विसर्जन उपक्रमाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी नऊ वाजता भवानी मंडप येथून पर्यावरण जनजागृती फेरी वाढली जाणार आहे. या फेरीत समितीच्या कार्यकर्त्यांसह शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत या फेरीला प्रारंभ होईल. भवानी मंडप येथून सुरू होणारी ही फेरी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेशमार्गे पंचगंगा नदीघाट येथे विसर्जित होणार आहे.
दीड दिवसाचा गणपती विसर्जन तसेच घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कोटीतीर्थ येथे विसर्जन कुंड ठेवले जाणार आहेत. समितीचे स्वयंसेवक विसर्जित मूर्तीचा स्वीकार करतील. त्यानंतर महानगरपालिकेच्या सहकार्याने त्या इराणी खाणीत सोडल्या जातील. समितीचे स्वयंसेवक रहदारीची शिस्त लावण्यासाठीही मदत करतील.