आजऱ्यात १० गावात प्रस्थापितांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:26 AM2021-01-19T04:26:38+5:302021-01-19T04:26:38+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १० ठिकाणी सत्तांतर तर ९ ठिकाणी सत्तारूढ, ५ बिनविरोध, १ ठिकाणी सर्वपक्षीय ...
आजरा :
आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १० ठिकाणी सत्तांतर तर ९ ठिकाणी सत्तारूढ, ५ बिनविरोध, १ ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी तर १ ठिकाणी संमिश्र आघाडीला संधी मिळाली. साखर कारखान्याच्या चार संचालकांना त्यांच्या गावात पराभवाला सामोरे जावे लागले.
सरपंच संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संभाजी सरदेसाई यांच्या पॅनेलचा पराभव झाला. शिरसंगीत कारखान्याच्या आजी-माजी संचालकांच्या पॅनेलला पराभूत करीत तिसऱ्या आघाडीने सत्ता हस्तगत केली. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. ११.३० वाजता सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. साखर कारखाना संचालक दिगंबर देसाई (शिरसंगी), एम. के. देसाई (सरोळी), दशरथ अमृते (हाळोली), अनिल फडके (सुळे) याठिकाणी मतदारांनी सत्तांतर घडवित संचालकांना गावातच रोखले. किणे येथे मसणू सुतार गटाची गेल्या २० वर्षाची सत्ता संपुष्टात आली. कारखाना संचालक विष्णूपंत केसरकर यांनी ९ पैकी ६ जागा जिंकून सत्तांतर घडविले. हालेवाडीत मुंबईचे नगरसेवक सदाशिव पाटील व सुरेश पाटील गटाला मतदारांनी सत्तासंघर्षात दूर ठेवत मानसिंग खोराटे गटाकडे पुन्हा सत्ता दिली.
---------------------------------
* बिनविरोध गावे - गवसे, होनेवाडी, खोराटवाडी, एरंडोळ, पेद्रेवाडी.
* सत्तांतर झालेली गावे - मुरूडे, हाळोली, निंगुडगे, शिरसंगी, सुळे, कासारकांडगाव, महागोंड, किणे, सरोळी, हत्तीवडे. ---------------------------------
* सत्ता अबाधित - जाधेवाडी, चिमणे, मुमेवाडी, चव्हाणवाडी, हालेवाडी, बेलेवाडी, देवकांडगाव, मलिग्रे, कोवाडे.
* सर्वपक्षीय आघाडी - वाटंगी
* संमिश्र गटांना संधी - देवर्डे
............
शिरसंगी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मंगल तिबीले पराभूत.
* निंगुडगेचे विद्यमान सरपंच संभाजी सरदेसाई पराभूत
* विजयी उमेदवारात युवकांचा समावेश.