Kolhapur: गुंडांच्या मारहाणीतील जखमी स्विटमार्ट चालकाचा मृत्यू, दोघांवर खुनाचा गुन्हा
By उद्धव गोडसे | Published: January 1, 2024 03:42 PM2024-01-01T15:42:43+5:302024-01-01T15:44:36+5:30
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुंडांचे फावल्याचा नातेवाईकांचा आरोप
कोल्हापूर : उद्यमनगर येथील स्विटमार्टमधील पदार्थ फुकट का खायला देत नाहीस, अशी विचारणा करीत दोन गुंडांनी घरात घुसून स्विटमार्टचे मालक शिवकुमार लक्ष्मीनारायण बघेल (वय ३३, रा. यादवनगर, कोल्हापूर) यांना बेदम मारहाण केली होती. २८ डिसेंबर रोज दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या मारहाणीतील जखमी बघेल यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. १) सकाळी सीपीआरमध्ये मृत्यू झाला. गुंडांच्या मारहाणीत बघेल यांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी राजारामपुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. मारहाण करणारे दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
उद्यमनगर परिसरात फाळकूट दादांची दहशत वाढली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने काही गुंड व्यावसायिकांकडून हप्तेवसुली करीत आहेत, असा परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. गुंड प्रथमेश सतीश शिंगे (वय २३, रा. यादवनगर, कोल्हापूर) आणि दिलीप हिंदुराव पाटील (वय ३३, रा. रायगड कॉलनी, पाचगाव) या दोघांनी २८ डिसेंबर रोजी उद्यमनगरातील श्रीराम स्विट मार्टचे मालक शिवकुमार बघेल यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती.
तसेच गुंडांनी दहशत माजवण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. फुकट मिठाई देत नसल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत बघेल बेदम जखमी झाले होते. उपचारादरम्यान सोमवारी सकाळी सीपीआरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
निर्मला शिवकुमार बघेल (वय ३३, रा. उद्यमनगर) यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. हल्लेखोर शिंगे आणि पाटील या दोघांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.