गोविंद पानसरेंच्या अंगावर जखमा आढळल्या, पंचांची न्यायालयात साक्ष; सुनावणीत नेमकं काय झालं..जाणून घ्या
By उद्धव गोडसे | Published: April 3, 2023 06:08 PM2023-04-03T18:08:40+5:302023-04-03T18:10:51+5:30
समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते.
कोल्हापूर : कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मृत्यूनंतर मुंबईत जे.जे. हॉस्पिटलमध्ये केलेल्या मृतदेहाच्या पंचनाम्यादरम्यान पानसरे यांच्या अंगावर जखमा आढळल्या, अशी साक्ष पंच साक्षीदार विजयकुमार धोंडू नार्वेकर (वय ६७, रा. महालक्ष्मी मंदिर कम्पाऊंड, मुंबई) यांनी दिली. तसेच जखमी पानसरे यांना रुग्णालयात दाखल करणारे मुकुंद कदम यांची रक्ताच्या डागाची कपडे पंच साक्षीदार सुनील शिवाजीराव जाधव (वय ४९, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी न्यायालयात ओळखले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर आज, सोमवारी (दि. ३) सुनावणी झाली. पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यात सोमवारी दोन पंच साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये २१ फेब्रुवारी २०१५ मध्ये पहाटेच्या सुमारास पानसरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळचे पंच विजयकुमार नार्वेकर यांची साक्ष विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी नोंदवली. पानसरे यांच्या मृतदेहाच्या छातीवर, डाव्या काखेखाली आणि मानेवर जखमा होत्या, तसेच डाव्या दंडावर आणि उजव्या गुडघ्याजवळही जखमा होत्या, अशी साक्ष नार्वेकर यांनी दिली.
जखमी अवस्थेतील पानसरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणारे मुकुंद कदम यांची रक्ताने माखलेली कपडे जप्त करून पोलिसांनी पंचनामा केला होता. त्यावेळचे पंच सुनील जाधव यांचीही साक्ष झाली. औषध वितरक कंपनीत काम करणारे जाधव यांना पोलिसांनी कपडे जप्तीचा पंच बनण्याची विनंती केल्याने ते पंचनाम्यासाठी हजर होते. तेव्हा पोलिसांनी दाखवलेल्या कदम यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, अशी साक्ष जाधव यांनी दिली.
बचाव पक्षामार्फत ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. प्रवीण करोशी आणि ॲड. समीर पटवर्धन यांनी पंच साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. पंचनाम्यातील वर्णण आणि न्यायालयातील साक्ष यामध्ये विसंगती असल्याचा मुद्दा न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. समीर गायकवाड, वीरेंद्र तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपी सुनावणीसाठी हजर होते.