पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णवाहिका वाटपात अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:07+5:302021-01-15T04:21:07+5:30
शब्बीर मुल्ला, यवलूज वार्ताहर : पडळ (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नव्याने देण्यात येणाऱ्या ...
शब्बीर मुल्ला, यवलूज वार्ताहर : पडळ (ता. पन्हाळा) प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून नव्याने देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका वाटपात अन्याय होत असल्याने या केंद्राला कोणी वालीच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया चौदा गावातील नागरिकांतून उमटू लागली आहे.
पडळ आरोग्य केंद्रात १४ गावांचा समावेश असून त्यामध्ये ७ उपकेंद्र कार्यान्वित आहेत. येथे उपचारासाठी नेहमीच रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिवाय भागातील महिलांही गरोदरपणाच्या काळात नियमित उपचार घेत असतात. आजतागायत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पडळ केंद्राला जुन्याच रुग्णवाहिका दिल्या आहेत. सध्या २००५ मॉडेलची सुमो गाडी रुग्णवाहिका म्हणून सेवेत आहे. ती वारंवार अनेकदा नादुरुस्त असते. अशा वेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्याकामी बऱ्याचदा बाहेरुन गाडी मागवावी लागते. २०१२ मध्ये या आरोग्यवर्धीसाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर झाली होती, पण प्रत्यक्षात ती पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय सेवेत आलीच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने ती गाडी आपल्या सेवेत सामावून घेऊन त्यांच्याकडची जुनी गाडी केंद्राला रुग्णवाहिका म्हणून दिली होती. तीच गाडी आजही वैद्यकीय सेवेत आहे. ती सुस्थितीत नसल्याने ती वारंवार रस्त्यात बंद पडली आहे. गाडीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राने वेळोवेळी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे नवीन रुग्णवाहिका मिळण्याकामी सुधारित प्रस्ताव दिले आहेत.
यंदा कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच मोठ्या संख्येने रुग्णवाहिका मंजूर झाल्या असूनसुद्धा पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राला मात्र नवीन गाडी देण्यापासून वंचित ठेवले आहे. २ सुसज्ज लसीकरण व्हॅनसह ३९ नवीन रुग्णवाहिका मंजूर झाल्या असताना जिल्ह्यातील कडगाव, पाटगाव, कोवाड, भादोले, पट्टणकोडोली, हेरले, कणेरी, हसूर, वाळवा, धामोड, कोतोली, तारळे, शित्तूर, बांबवडे, कंरजफेण, परळी निनाई, अब्दुललाट, जयसिंगपूर, उत्तूर, माणगाव, नूल, आळते, कापशी, सरूड, पोर्ले, कवठेगुलंद, दाजीपूर, मासुर्ली, राजगोळी, कुंभोज, मलिग्रे, वाटंगी, केखले व तारळे या आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार आहे; परंतु पडळ केंद्रातील चौदा गावांना सर्वसामान्य व गरीब रुग्ण नेहमीच मोठया प्रमाणात वैद्यकीय उपचार घेत असताना यावेळीही जिल्हा परिषद आरोग्य विभागांकडून पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुन्हा नव्याने जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागातून प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद सदस्य यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थांतून कमालीची नाराजी निर्माण झाली आहे.
चौकट - या रुग्णालयाकडे असणारी रुग्णवाहिका सुस्थितीत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला प्रत्येक वेळी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावेळी तरी या आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात यावी.
- आर. व्ही. भिसे, वैद्यकीय अधिकारी, पडळ. फोटो ओळ - पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुस्थितीत नसलेली २००५ मॉडेल रुग्णवाहिका.