‘गोकूळ'च्या पॅनल रचनेत गडहिंग्लज विभागावर अन्याय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:58+5:302021-04-19T04:22:58+5:30
राम मगदूम। गडहिंग्लज : केवळ ६४१ ठराव असलेल्या करवीर तालुक्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून ५ ते ६ जागा देण्याच्या ...
राम मगदूम। गडहिंग्लज :
केवळ ६४१ ठराव असलेल्या करवीर तालुक्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून ५ ते ६ जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत; परंतु गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत मिळून ८५२ ठराव असतानाही दोन्ही आघाड्यांकडून गडहिंग्लज विभागाची ३-४ जागांवरच बोळवण केली जात आहे. त्यामुळे तीन्ही तालुक्यांना मिळून एकूण ठरावांच्या प्रमाणात किमान ६ जागा द्याव्यात, अशी दूध उत्पादकांची मागणी आहे.
गेल्या वेळी सत्तारूढ आघाडीने गडहिंग्लजमध्ये १, चंदगडला २, तर आजऱ्याला १ जागा दिली होती. विरोधी आघाडीने गडहिंग्लजला २, आजऱ्याला १, तर चंदगडमध्ये उमेदवारीच दिली नव्हती; परंतु नव्या राजकीय समीकरणामुळे गडहिंग्लज विभागातही दोन्ही आघाड्यांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. म्हणूनच दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांसमोर गडहिंग्लज विभागातील उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
सत्तारूढ आघाडीकडून गडहिंग्लजमध्ये सदानंद हत्तरकी व प्रकाश चव्हाण, चंदगडमध्ये दीपक पाटील व वसंत निकम, आजऱ्यातून रवींद्र आपटे हेच प्रबळ दावेदार आहेत. या सर्वांना सामावून घ्यायचे झाल्यास एकूण ५ जागा द्याव्या लागतील.
विरोधी गटाकडून गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादीतर्फे सतीश पाटील, महाबळेश्वर चौगुले, अभिजीत पाटील-औरनाळकर व सुरेखा बाबूराव चौगुले, काँग्रेसतर्फे विद्याधर गुरबे व सोमगोंडा आरबोळे, शिवसेनेतर्फे बाळासाहेब कुपेकर, तर ‘चंदगड’मध्ये राष्ट्रवादीच्या सुश्मिता राजेश पाटील, काँग्रेसचे विक्रम सुरेश चव्हाण-पाटील व विशाल गोपाळराव पाटील, तर आजऱ्यातून काँग्रेसच्या अंजना रेडेकर, राष्ट्रवादीचे एम. के. देसाई व शिंपी गटाचे अभिषेक शिंपी हे दावेदार आहेत. त्यामुळे राजकीय समतोल राखण्यासाठी विरोधकांनाही किमान ५ किंवा ६ जागा द्याव्या लागतील.
तीनही तालुक्यांतील प्रमुख राजकीय पक्ष-गटाकडील ठरावधारक व इच्छुकांची संख्या आणि यावेळची परिस्थिती विचारात घेता दोन्ही आघाड्यांनी तीनही तालुक्यांना प्रत्येकी किमान दोन जागा दिल्या तरच उमेदवारीचा गुंता सुटून विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
--------------------------
* तालुकानिहाय ठरावधारक असे
- गडहिंग्लज- २७३, आजरा- २३३, चंदगड- ३४६
--------------------------
* गडहिंग्लज-चंदगडचा पेच..! राष्ट्रवादीतर्फे गडहिंग्लजमधून मंत्री मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी सतीश पाटील यांची, तर चंदगडमधून सुश्मिता राजेश पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे; परंतु गडहिंग्लजची उमेदवारी चंदगड मतदारसंघातील कार्यकर्त्याला मिळावी यासाठी आ. राजेश पाटील व माजी आ. संध्यादेवी कुपेकर हे आग्रही आहेत, तसेच गडहिंग्लज विभागात काँग्रेसच्या वाढीसाठी झटलेला तरुण सहकारी म्हणून विद्याधर गुरबे यांना संधी देण्याची मंत्री सतेज पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे जागा वाढवल्याशिवाय विरोधी आघाडीतील ‘गडहिंग्लज’ विभागाच्या उमेदवारीचा गुंता सुटणे शक्य नाही. विरोधकांनी जागा वाढवल्या तर सत्ताधाऱ्यांनाही जागा वाढविल्याशिवाय पर्याय नाही.
------------------------