अन्यायाचा, आरोपांचा हिशेब चुकता करणार : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:26 AM2017-12-04T00:26:40+5:302017-12-04T00:27:48+5:30
कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्षभरात प्रचंड घाव सहन केले आहे. अन्याय, आरोप, हल्ले पचवले आहेत. आता माघार नाही, हिशेब चुकता करणार आहे, असा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला. तर वेळ येईल त्या दिवशी सामान्य जनता गुलाल लावून रस्त्यावर नाचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या लोकसभा निवडणुकीचेच आव्हान दिले आहे.
शिरढोण (ता. शिरोळ) येथील गावचावडीसमोर रयत क्रांती शेतमजूर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी आयोजित केलेल्या शेतमजूर संघटनेच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच बिल्किस मुजावर होत्या. यावेळी रयत क्रांतीचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील, सागर खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री खोत यांची उघड्या जीपमधून गावात मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यात शेतमजूर विशेषत: महिलांची उपस्थिती अधिक होती.
यावेळी खोत यांनी नाव न घेता खासदार शेट्टी यांच्यावर टीकेचा भडिमार केला. ते म्हणाले, संधीसाधू व भावनिकतेचे राजकारण फार काळ टीकत नाही. लोकांना उपाशी ठेवून स्वत: गबर व्हायचे दिवस आता संपले आहेत. ‘स्वाभिमानी’ची मूल्यमापन समिती खासदार शेट्टी यांचा जयजयकार करणारी आहे. मी कुणाचा गुलाम राहणार नाही. आवाडे नको म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून दिले अन् आता गळ्यात गळे घालत आहेत, ही कसली नैतिकता.
मी शेतकºयांसाठी लढणारा कार्यकर्ता असून, पाकिटातून पैसे घालून, सभेत डबे फिरून पैसे मिळणाºयांची मला गरज नाही. तर मायेने हात फिरवणाºया माणसांची गरज आहे. जातीपाती पलीकडे जाऊन सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यापारी व सामान्य जनतेला घेऊन राजकारण करणार असून, तालुक्यात नवी क्रांती करणार आहे. शेतमजूर महिलांच्या पेन्शनसाठी तुम्ही रस्त्यावरील लढाई लढा. मी मंत्रालयाची लढाई लढून तुम्हाला न्याय मिळवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सुरेशदादा पाटील, शेतमजूर संघटना प. महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे, सागर खोत, जि. प. सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास टाकवडेचे सरपंच पी. वाय. पाटील, उपसरपंच नागेश काळे, संजय शिंदे, उपसरपंच विलास चौगुले, विजय मगदूम, रावसाहेब बिरोजे, आदी उपस्थित होते. आभार डॉ. कुमार पाटील यांनी मानले.
ऊस परिषद नव्हे हे तर 'जलसा'
‘स्वाभिमानी’च्या परिषदेत उसाच्या दराचा मुद्दा बाजूलाच राहिला. प्रत्येक वक्ता माझ्यावर तोंडसुख घेत होता. प्रत्येक वक्त्याला माझ्यावर काय बोलायचे हे शेट्टी यांनी सांगून ठेवले होते. त्यामुळे लोकांची करमणूक होत असल्याने ही ऊस परिषद नसून जलसाच होती, अशी टीका मंत्री खोत यांनी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
शेतमजुरांसाठी रुग्णवाहिका
शेतमजुरांनी स्वत:ला एकटे समजू नये. तुमच्या प्रत्येक सुख-दु:खात फक्त सदाभाऊ सहभागी राहणार असून, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शेतमजूर संघटनेला शासनाकडून रुग्णवाहिका देण्याचे मंत्री खोत यांनी जाहीर केले.