वनअधिकाऱ्यांकडून वृक्षप्रेमींवर अन्याय, निसर्गमित्रकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 08:31 PM2020-09-04T20:31:28+5:302020-09-04T20:32:50+5:30
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाºयांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य उचकटून जप्त केले. त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे, या अन्यायाचा निसर्ग मित्र संस्थेने निषेध केला आहे.
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौगुले यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. तरीही त्यांच्यावरील तिरस्कारामुळे स्थानिक लोक आणि वनअधिकाऱ्यांनी त्यांना गुन्हेगार ठरवून कर्मचाऱ्यांमार्फत अतिक्रमण हटाव मोहिमेच्या आडून वनराईतील वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक साहित्य उचकटून जप्त केले. त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे, या अन्यायाचा निसर्ग मित्र संस्थेने निषेध केला आहे.
पोर्ले गावाशेजारी वनविभागाच्या २५ एकर ओसाड जमिनीवर सात ते आठ वर्षात त्यांच्या संमतीनेच दिनकर चौगुले यांनी दहा हजार देशी वृक्षांची लागवड करुन वनराई (जंगल) तयार केले. तसेच ७0 हजार रुपये खर्च करुन अडीच लाख लीटर क्षमतेचे वनतळे तयार केले. परंतु परिसरातील कांही विघ्नसंतोषी लोकांनी तीनचार वर्षापासून वनराईला आग लावणे, ठिबकच्या पाईप तोडणे, जाळणे असे प्रकार सुरु केले. वनराईमुळे गुरे, शेळ्या-मेंढ्या चरण्याची जागा कमी झाल्यामुळे तिरस्काराने हा प्रकार या लोकांनी केला. याबाबत वेळोवेळी तक्रार केल्याने लोकांनी नासधूस केली.
वन खात्याकडे वारंवार तक्रार करतात म्हणून वनकर्मचाऱ्यांकडूनच त्यांना मारहाण केली. तसेच वनराईतील साहित्याचे नुकसान केले. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनीही शहानिशा न करता चौगुले यांच्यावरच कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. या प्रकाराचा निसर्गमित्र संस्थेने निषेध केला आहे. निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक सुरेश शिपूरकर, संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, कार्यवाह अनिल चौगुले आदींनी या घटनेचा निषेध केला आहे.