विहिंपकडून नगरअभियंत्यांसह दोघांवर शाई
By admin | Published: January 20, 2016 01:21 AM2016-01-20T01:21:55+5:302016-01-20T01:22:14+5:30
इचलकरंजी नगरपरिषद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई : पोतदार
इचलकरंजी : नगरपालिका हद्दीतील अवैध धार्मिक स्थळे हलविण्याच्या कारणावरून येथील विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चातील एका कार्यकर्त्याने नगरअभियंता भाऊसाहेब पाटील व प्रशासन अधिकारी निवृत्ती गवळी यांच्यावर शाई फेकल्याने वातावरण तंग झाले. नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काम बंद करून पालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. दोन्ही बाजूने घोषणा-प्रतिघोषणा झाल्या.
नगरपरिषदेने मंगळवारी फक्त हिंदूंचीच धार्मिक स्थळे पाडण्याची नोटीस जाहीर केली. याला आक्षेप घेत विश्व हिंदू परिषदेने पालिकेवर निषेध मोर्चा काढला. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनासमोर मोर्चा आला, पण त्यांचे दालन बंद होते. त्यामुळे हा मोर्चा अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या दालनाकडे वळला. तेथे चर्चा सुरू असताना विहिंपचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळ महाराज यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी मुख्याधिकारी डॉ. रसाळ हे वारणा नळ पाणी योजनेच्या पाहणीसाठी बाहेर गेल्याचे समजले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता मुख्याधिकाऱ्यांकडून व्यवस्थित उत्तर येत नसल्याचे पाहून बाळ महाराज अधिकच संतापले. नोटीस मागे घेतल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी अमर माने याने नगरअभियंता पाटील व प्रशासन अधिकारी निवृत्ती गवळी यांच्या अंगावर शाई फेकली. त्यामुळे या बैठकीत गोंधळ उडाला.
ही घटना समजताच पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर गर्दी केली. शाई फेकल्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी पालिका सभागृहात गेले व तिथे या घटनेच्या निषेधार्थ काम बंद करून ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारात जाऊन जमिनीवर बसत ठिय्या आंदोलन सुरू केले. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शाई फेकल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर विहिंपचे सर्व कार्यकर्ते जमले. त्यांनीही पालिकेच्या एकतर्फी कारवाईचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय साळुंखे मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे हेही त्याठिकाणी आले.
पोलीस अधिकारी आणि उपनगराध्यक्ष रणजित जाधव, नगरसेवक तानाजी पोवार या दोघांनी परस्परांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांच्याशीही चर्चा झाली. त्यावेळी पाटील व गवळी आणि विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी झालेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले.
हा प्रकार सुरू असताना इकडे नगरपालिका प्रशासन, विहिंपचे प्रमुख कार्यकर्ते व पोलीस अधिकारी यांची पालिकेत एक बैठक झाली. या बैठकीस नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व उपनगराध्यक्ष जाधव हेही उपस्थित होते. त्यावेळी बाळ महाराज यांनी पालिका प्रशासन एकतर्फी कारवाई करून धार्मिक भावना भडकवीत असल्याचा आरोप केला.
दिलीप माणगावकर यांनी यासंदर्भात दिलेल्या अन्य तक्रारींबाबत नगरपालिका कोणतीच कारवाई करीत नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली. पालिकेने काढलेल्या नोटिसा ताबडतोब मागे घ्याव्यात, अशी मागणी करीत शाई फेकलेल्या प्रकाराबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
मात्र, अवैध धार्मिक स्थळांवरील ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे. त्यामुळे नोटिसींना स्थगिती देता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. तेव्हा अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार व बाळ महाराज यांच्यात शाब्दिक वाद झाला. या बैठकीत अखेर कोणताही मार्ग निघत नसल्यामुळे विहिंपचे कार्यकर्तेसुद्धा मोर्चाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे गेले. (प्रतिनिधी)
निष्कासित होणाऱ्या धार्मिक स्थळांना विहिंपचा विरोध
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडून शहरातील सर्व धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये वर्गवारी करण्यात आली असून, त्यापैकी काही अवैध धार्मिक स्थळे हटविण्याच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या.
त्याबाबतची सुनावणीसुद्धा आठवड्यापूर्वी झाली. त्यानंतर सन २००९ नंतर बांधण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळे पाडण्याची नोटीस पालिकेने वृत्तपत्रांतून प्रसिद्धीस दिली होती. ही धार्मिक स्थळे सात दिवसांत निष्कासित करण्यात येतील, असाही आशय या नोटिसीमध्ये होता आणि याच नोटिसीला विहिंपने आक्षेप घेतला.