इंचनाळला महालक्ष्मी यात्रेचा वाद
By admin | Published: February 13, 2016 12:30 AM2016-02-13T00:30:35+5:302016-02-13T00:31:14+5:30
तारखेबाबत मतभेद : गावसभेत तोडगा न निघाल्याने चाकरमान्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे मागितली दाद
गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई-पुणेस्थित ग्रामस्थ यांच्यात मतभेद आहेत. यासंदर्भात गावसभेतही तोडगा न निघाल्यामुळे मुंबईकरांनी समांतर सभा घेतली. दोन्ही बाजंूची मंडळी आपापल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळे यात्रेबाबत पेच निर्माण झाला आहे. शेवटी चाकरमान्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.श्री गणेश जयंतीनिमित्त ग्रामदैवत गणपती देवाच्या महाप्रसादासाठी चाकरमानी मंडळी गावी आली आहेत. गुरुवारी सायंकाळी मुंबईकरांची बैठक झाली. त्यात विद्यार्थी व नोकरदार मंडळींच्या सोयीसाठी यात्रा मेमध्ये करावी, अशी सूचना आली. त्यानुसार स्थानिक प्रमुख मंडळींकडे मुंबईकरांची कैफियत मांडण्यात आली. त्यामुळे यात्रेसाठी दवंडी देऊन ग्रामसभा बोलविण्यात आली. शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या आवारात सभा झाली.२६ जानेवारी २०१६ च्या ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे २९ व ३० मार्चलाच यात्रा होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पुढील पाच वर्षांनी होणारी यात्रा मेच्या सुटीत करण्यात येईल, असे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यास मुंबई-पुणेकरांनी जोरदार हरकत घेतली आणि समांतर सभा घेऊन १० व ११ मे रोजी यात्रा करण्याचा निर्णय जाहीर केला.
यावेळी माजी सरपंच आनंदराव पोवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमृत पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष सयाजी देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पोवार, आदींसह हक्कदार व मानकरी उपस्थित होते.
समांतर सभेत मुंबईकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील, तानाजी पाटील व फत्तेसिंह पाटील यांनी चाकरमान्यांची भावना व भूमिका स्पष्ट केली. यावेळी बापूसाहेब नांदवडे, संभाजी पाटील, संभाजी आजगेकर, धनाजी पाटील, विलास कुंभार, अशोक पाटील, मनोहर जाधव, दिलीप पाटील, मानसिंग पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सामोपचाराने सर्वांच्या सोयीच्या तारखा निश्चित करण्याऐवजी दोन्ही बाजंूची मंडळी आपापल्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळेच यात्रेचा वादही प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे. कौलगे पाठोपाठ इंचनाळच्या लक्ष्मी यात्रेबाबतही वाद निर्माण झाला आहे.
आर्थिक वर्षाअखेरमुळे रजा नाही
पुणे-मुंबईकर म्हणतात, मार्च महिन्यात आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे नोकरदार मंडळींना रजा-सुटी मिळत नाही. त्याशिवाय शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील याच महिन्यात आहेत. त्यामुळे सर्वांना आनंद लुटता यावा, यासाठीच मे मध्ये यात्रा करण्यात यावी.
तिथीनुसार यात्रा
स्थानिक पुढारी म्हणतात, प्रथेप्रमाणे तिथीनुसार मार्चमध्येच यात्रा होईल. यापूर्वीच्या ग्रामसभेतही तसाच निर्णय झाला आहे. त्यामुळे यात्रेच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही.