Kolhapur: तो पाहुणा म्हणून यायचा, दागिने चोरून निघून जायचा; सराईत चोरटा बाळासो पाटील अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:00 IST2025-04-18T17:00:09+5:302025-04-18T17:00:45+5:30
दागिने पुरून ठेवले, तीन गुन्ह्यांचा उलगडा

Kolhapur: तो पाहुणा म्हणून यायचा, दागिने चोरून निघून जायचा; सराईत चोरटा बाळासो पाटील अटकेत
कोल्हापूर : लग्न, जावळ, बारसे अशा समारंभांमध्ये पाहुणा बनून येऊन दागिन्यांवर डल्ला मारणारा सराईत चोरटा बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय २८, रा. आदमापूर, ता. भुदरगड) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत तीन गुन्ह्यांची उकल झाली असून, चोरीतील ३ लाख ७८ हजारांचे ४२ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले.
नवीन कपडे, डोक्यावर फेटा आणि हसऱ्या चेहऱ्याने तो समारंभात सर्वत्र वावरायचा. जणू काही या समारंभाचे आपणच आयोजक आहे, असा त्याचा थाट असायचा. मुहूर्तापूर्वी तो पाहुणे आणि निमंत्रितांनी आणलेल्या चीजवस्तू हेरून ठेवायचा. मंगल अक्षता सुरू होताच वधू-वराच्या खोलीत जाऊन दागिन्यांवर डल्ला मारायचा. पाहुणा बनून येऊन समारंभात चोरी करणाऱ्या चोरट्याने गेल्या महिनाभरात धुमाकूळ घातला होता.
चोरी झालेल्या समारंभांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर संशयित चोरटा आदमापूर येथील बाळासो ऊर्फ अजित पाटील असल्याची माहिती अंमलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी आणि अमित सर्जे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि शेष मोरे यांच्या पथकाने आदमापुरातून चोरट्याला अटक केली.
त्याच्या चौकशीत लक्ष्मीपुरी, कळंबा येथील जय पॅलेस आणि हणबरवाडी येथील सृष्टी फार्महाऊसमध्ये झालेल्या तीन चोऱ्यांचा उलगडा झाला. त्याने आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. पुढील तपासासाठी त्याचा ताबा लक्ष्मीपुरी पोलिसांकडे देण्यात आला.
कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांत २१ गुन्हे
बाळासो पाटील हा सराईत चोरटा असून, तो दहावी नापास आहे. आदमापुरातील बाळूमामा मंदिरात बकऱ्यांचा सेवेकरी म्हणून तो काम करतो. सेवेच्या निमित्ताने बाहेर फिरताना तो चोऱ्या करत होता. त्याच्यावर कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत घरफोडी, जबरी चोरीचे २१ गुन्हे दाखल आहेत.
इन्स्टावर ३० हजार फॉलोअर्स
सराईत चोरटा पाटील हा इन्स्टा अकाऊंटवरून बाळूमामा मंदिरातील फोटो टाकतो. त्याचे ३० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी अटक करून त्याचे खरे रूप लोकांसमोर आणले.
दागिने पुरून ठेवले
बाळासोा पाटील याने चोरीतील सर्व दागिने एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डबा गावात जनावरांच्या शेडजवळ पुरला होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने डबा पुरलेली जागा दाखवली. पोलिसांनी जमीन खोदून दागिन्यांचा डबा बाहेर काढला.