शिवाजी विद्यापीठात नवसंशोधनाचे आविष्कार; विविध प्रकल्पांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:03 PM2018-12-28T16:03:47+5:302018-12-28T16:07:43+5:30
शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले.
कोल्हापूर : दिव्यांग विद्यार्थी, व्यक्तींसाठी चष्म्यांद्वारे संगणकासाठी वापरता येणारा स्पेक्टॅकल्स् माऊस, स्मार्ट ब्लार्इंड स्टिक, गतीरोधक आणि वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाऱ्यावर वीजनिर्मिती करणारा सडक बिजली जनरेटर, असे विविध स्वरूपातील नवसंशोधनाचे दर्शन शुक्रवारी घडले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठातील आविष्कार संशोधन महोत्सव. या महोत्सवात पदव्युत्तर पातळीवरील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संशोधन विषयक विविध प्रकल्प सादर केले.
या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर प्रमुख उपस्थितांनी महोत्सवातील प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधला. तज्ञांनी प्रकल्पांचे परीक्षण केले.
या महोत्सवात विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अमोल माळी याने अल्ट्रासोनिक सेन्सरचा वापरातून दिव्यांगांसाठी तयार केलेली स्मार्ट ब्लार्इंड स्टीक सादर केली. ओमकार साळुंखे याने डोळे आणि डोक्याच्या हालचालीद्वारे वापरता येणारा संगणकाचा माऊसचे संशोधन मांडले. घरातील पाणीसाठ्याची माहिती देणारी वायरलेस यंत्रणेचे उपकरणे पांडुरंग गायकवाडने सादर केले.
प्राणीशास्त्र विभागातील योगेश माने याने साप पकडण्यासाठीच्या पर्यावरपूरक स्टिकचे संशोधन मांडले. कराडच्या एसजीएम कॉलेजच्या प्रतिक्षा यादव हिने ब्ल्यूटूथद्वारे तापमान, आर्द्रता जाणून घेणारा प्रकल्प सादर केला.
साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शाम बंडगरने सडक बिजली जनरेटर, तर पल्लवी दिक्षे हिने विद्यार्थी अभिरूची संशोधन मांडले. या महोत्सवात मानव्यशास्त्र, वाणिज्य, मूलभूत विज्ञान, शेती व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र व औषधशास्त्र प्रकारातील या महोत्सवात दोनशे पदव्युत्तर संशोधक, शिक्षक, विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले. त्यांची उपकरणे, प्रकल्प पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
आपल्या विषयाशी निगडित प्रकल्पांची माहिती बारकाईने घेत होते. दरम्यान, पदवी आणि पदव्युत्तर गटातील विजेत्यांची अंतिम स्पर्धा दि. ४ जानेवारीला विद्यापीठात होणार असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले.
भित्तीपत्रकातून अभ्यासपूर्ण मांडणी
या महोत्सवातील अधिकतर स्पर्धकांनी भित्तीचित्रांचे सादरीकरण केले. त्यात इस्लामपूर शहरातील ई-शॉपिंग, भारतातील ग्रामीण उद्योगांच्या समस्या व उपाययोजना, उचगावमधील पारधी समाजाची भाषा, बाबंूपासून विविध वस्तू करणाऱ्या बुरूड समाजाची स्थिती, दुष्काळी भागातील महिला उद्योगांसमोरील समस्या, भाषिक उपाययोजनांची क्षेत्रे व मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी, फौंड्री उद्योगातील कामगारांची स्थिती आदी विषयांची अभ्यासपूर्ण मांडली केली.