विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांतून उद्योगक्षेत्राच्या समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:43+5:302021-06-26T04:17:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ४९ महाविद्यालयांना आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन (आयडिया) लॅॅब ...

The innovations of the students will solve the problems of the industry | विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांतून उद्योगक्षेत्राच्या समस्या मार्गी लागणार

विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांतून उद्योगक्षेत्राच्या समस्या मार्गी लागणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशातील ४९ महाविद्यालयांना आयडिया डेव्हलपमेंट इव्हॅल्युएशन ॲप्लिकेशन (आयडिया) लॅॅब स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयामध्ये ‘आयडिया लॅब’ साकारण्यात येणार आहे. या लॅबची संकल्पना, त्यातून विद्यार्थी, शिक्षक आणि कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्राला कोणता उपयोग होणार, आदींबाबत या लॅबचे समन्वयक डॉ. शिवलिंग पिसे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

प्रश्न : आयडिया लॅबची संकल्पना काय आहे?

उत्तर : कौशल्य विकासासह आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल याला बळ देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषेदेने आयडिया लॅबचे पाऊल टाकले आहे. या परिषेदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबु्ध्दे यांनी पुणे इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक असताना त्याठिकाणी फॅॅबलॅब उभी केली. त्याद्वारे तेथील विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून काही उत्पादने निर्माण केली. त्यातील नॅनो सॅटेलाईटचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होते. या ‘फॅबलॅब’च्या धर्तीवर एआयसीटीईने आयडिया लॅब ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पना या उत्पादनांमध्ये रूपांतरित होण्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्था उभारणे, नवसंकल्पनांच्या माध्यमातून उद्योगक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे.

प्रश्न : या लॅबमध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत?

उत्तर : उद्योग, व्यवसाय, संशोधन आणि विकास आदी क्षेत्रांना उपयुक्त ठरणारे कोणत्याही स्वरूपातील प्रोटोटाईप तयार करण्यासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक यंत्रसाम्रुगी केआयटी महाविद्यालयामधील या आयडिया लॅबमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यात थ्रीडी प्रिंटर, थ्रीडी स्कॅनर, हायड्रॉलिक प्रेस, वेल्डिंग, सोल्डरिंग, पीसीबी मिलिंग मशीन अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक स्वरूपातील मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार याठिकाणी उपलब्ध असणार आहे.

प्रश्न : विद्यार्थी, शिक्षकांना कसा उपयोग होणार आहे?

उत्तर : या लॅबसाठी देशभरातून २०४ प्रस्ताव एआयसीटीईकडे दाखल झाले होते. त्यातून मंजूर झालेल्या अंतिम ४९ प्रस्तावांमध्ये केआयटी महाविद्यालयाचा समावेश होणे हे कोल्हापूरच्या नावलौकिकामध्ये भर घालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना बळ देणे हा मुख्य उद्देश या लॅबचा आहे. केवळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्याच नव्हे, तर अन्य विद्याशाखांमधील महाविद्यालयीन तरूणाई आणि शालेय विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रासह अन्य काही समस्या सोडविण्यासाठीच्या संकल्पना या लॅबच्या माध्यमातून मांडता येणार आहेत. या संकल्पनेवर प्रात्यक्षिक करून उपकरणे साकारता येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कौशल्य विकासाला बळ मिळणार आहे. शिक्षकांनादेखील संकल्पना मांडण्यासह त्यांच्या विषयातील संशोधन करण्यासाठी या लॅबची मदत घेता येणार आहे. विद्यार्थी, शिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आदी उपक्रमांचे या लॅबच्या माध्यमातून आयोजन केले जाणार आहे.

चौकट

उद्योग क्षेत्राचे मोलाचे योगदान

केआयटी महाविद्यालयामध्ये ही आयडिया लॅब उभी करण्यामध्ये कोल्हापूरमधील उद्योगक्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. कोल्हापूर, पुणे, हैदराबाद, कुवेतमधील विविध ३४ उद्योगांनी, माजी विद्यार्थ्यांनी या लॅबसाठी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या माध्यमातून १ कोटी २० लाख रूपयांचा निधी संकलित झाला आहे. इतकी रक्कम जमा होणारे केआयटी देशातील एकमेव महाविद्यालय आहे. या लॅबमध्ये होणारे संशोधन हे प्रामुख्याने उद्योगांबाबत असणार आहे. नवीन उत्पादन विकास, त्यामध्ये आणि सध्या असलेल्या उत्पादनांमध्ये सुधारणा करणे यासह उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणींवर उत्तर शोधण्याचे काम या लॅॅबद्वारे होणार असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले.

चौकट

लॅबचा पुढील टप्पा

या आयडिया लॅबमधील सुविधा आठवड्यातील सात दिवस आणि २४ तास उपलब्ध असणार आहे. या लॅबची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लॅब सुरू केली जाणार आहे. लॅबचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी माहितीपर कार्यक्रम घेण्यात येतील. एआयसीटीईच्या नियमानुसार या लॅबमध्ये आणखी काही अद्ययावत यंत्रे, उपकरणे खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १ कोटी ७५ लाख रूपये इतका खर्च प्रस्तावित असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना व्यासपीठ देण्यासह उद्योगक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी या अभिनव आयडिया लॅबचा उपयोग होणार आहे. या समस्यांवर केवळ उत्तर, पर्याय शोधण्यासाठी सक्षम अभिनव मानसिकता तयार करणे असे नाही, तर हीच मानसिकता उत्पादनांच्या विकासाकडे नेण्यासह संकल्पनांची अंमलबजावणी करण्यास बळ देण्याचा केआयटीचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ. शिवलिंग पिसे

फोटो (२५०६२०२१-कोल-शिवलिंग पिसे (केआयटी)

===Photopath===

250621\25kol_1_25062021_5.jpg

===Caption===

फोटो (२५०६२०२१-कोल-शिवलिंग पिसे (केआयटी)

Web Title: The innovations of the students will solve the problems of the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.