Kolhapur: आवाजावर फवारणारा अभिनव 'कारंजा'; मंत्री मुश्रीफांनी जोराने पत्नीचे नाव पुकारीत केले उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:09 IST2025-02-04T17:06:10+5:302025-02-04T17:09:21+5:30
देशातील हा पहिला कारंजा असल्याचा दावा

Kolhapur: आवाजावर फवारणारा अभिनव 'कारंजा'; मंत्री मुश्रीफांनी जोराने पत्नीचे नाव पुकारीत केले उद्घाटन
कागल : येथील नगरपालिकेने विकसित केलेल्या पाझर तलाव पर्यटन केंद्रावर आता एक अभिनव असा कारंजा उभा केला आहे. तो लोकांच्या आवाजाच्या क्षमतेवर वर - खाली होणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली पत्नी सायराबी मुश्रीफ यांचे नाव जोराने पुकारीत या कारंजाचे उद्घाटन केले. मंत्री मुश्रीफ यांच्या या कृतीची मतदारसंघासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या कारंजाला "बायकोवरील प्रेम तपासणारा कारंजा " असे नाव द्या, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी अजय पाटणकर, नवल बोते, सुनील माने, संजय चितारी, विवेक लोटे, अमित पिष्टे, किरण मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण काळबर यांनी या कारंजाची आणि यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. आयआयटीमधील तज्ज्ञांची मदत घेऊन केलेला देशातील हा पहिला कारंजा असल्याचा दावा त्यांनी केला. या पर्यटन केंद्रावर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी येथे पर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या अन्य काही कामांचा आढावा घेऊन कौतुकही केले.
माफक तिकीट दर
रोज सायंकाळी हा कारंजा सुरू राहणार असून, येथे यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आपल्या प्रियजनाचे नाव पुकारण्यासाठी माफक दर आकारला आहे, अशी माहिती नगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.