श्रीधर सावंत विद्यामंदिरच्या संस्था प्रमुखांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:34 AM2020-12-30T04:34:27+5:302020-12-30T04:34:27+5:30
कोल्हापूर : येथील डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस. एम. पाटील यांना झालेली शिवीगाळ, धक्काबुक्कीप्रकरणी जय ...
कोल्हापूर : येथील डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस. एम. पाटील यांना झालेली शिवीगाळ, धक्काबुक्कीप्रकरणी जय भारत शिक्षण संस्थेच्या प्रमुखांच्या कारभाराची चौकशी करावी, या शाळेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी सर्व संघटना कृती समितीच्यावतीने मंगळवारी करण्यात आली. त्याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांना देण्यात आले.
घडलेला प्रकार गंभीर स्वरूपाचा असून त्याबाबत लवकरच चौकशी समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन सोनवणे यांनी दिले.
शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षकांच्या पाठीशी संघटना नेहमी ठामपणे उभी असल्याचे सांगितले. महासंघाचे संतोष आयरे यांनी, ज्या शाळांमध्ये शिक्षकांना त्रास दिला जातो, त्या शिक्षकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी घडलेली घटना गंभीर स्वरूपाची असून, या सर्व संघ शिक्षकांच्या पाठीशी आमची संघटना ठामपणे उभी असल्याचे जाहीर केले.
सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, सविता गिरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी शिक्षकांवरील अन्यायाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आनंदराव हिरुगडे, महादेव डावरे, अनिल सरक, राजेश कोंडेकर, कुमार पाटील, अशोक पाटील आदी उपस्थित होते.