पार्श्वनाथ बँकेत जुन्या नोटा भरणाऱ्यांचीही चौकशी करा

By admin | Published: November 18, 2016 11:58 PM2016-11-18T23:58:30+5:302016-11-18T23:58:30+5:30

हसन मुश्रीफ : चंद्रकांतदादांना खुले आव्हान; नवीन चलन नसल्याने जिल्हा बँकांची मुस्कटदाबी; पंतप्रधानांच्या निर्णयाने अनेकांचा बळी

Inquire about old notes in Parsvnath Bank | पार्श्वनाथ बँकेत जुन्या नोटा भरणाऱ्यांचीही चौकशी करा

पार्श्वनाथ बँकेत जुन्या नोटा भरणाऱ्यांचीही चौकशी करा

Next

कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुरगूडच्या प्रचारसभेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा भरल्या त्यांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे मी स्वागत करतो. ही नावे तर त्यांनी जाहीर करावीच. त्याचबरोबर आयकर विभाग, ईडीमार्फत या सर्वांची जाहीर चौकशीही करावी. मात्र, अशाच पद्धतीने पार्श्वनाथ बँकेत ज्यांनी जुन्या नोटा भरल्या त्यांचीही नावे जाहीर करून चौकशी करावी, असे आव्हान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिले आहे.
कागल येथे भैया माने यांच्या अंबिका सदरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँकेत जर अशा कोणाच्या नोटा आल्या असतील तर ती नावे ते जाहीर करू शकतात. कारण आज शासन त्यांचेच आहे. त्यांच्यासोबत पार्श्वनाथ बँकेतही कोणी कोणी या जुन्या नोटांचा भरणा केला आहे तीही नावे जनतेला समजायला हवीत. सत्य उघडकीस येण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही नावे जाहीर करावीच; पण या लोकांची आयकर विभागामार्फत, ईडीमार्फत चौकशी करावी, आपले बोलणे फक्त जाहीर सभेत प्रचारापुरते होते असे लोकांना वाटू नये यासाठी आता चंद्रकांतदादांनी तातडीने हे काम करावे. कोल्हापूर जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. १९२ शाखा आहेत. नवीन चलन उपलब्ध करून दिले नसल्याने सर्व जिल्हा बँकांची मुस्कटदाबी सुरू आहे. जिल्हा बँकेशी संलग्न असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागातील लोक याबद्दल रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती बनली आहे. मागणी एवढी रक्कम मिळत नसल्याने जिल्हा बँकेवर फार मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. संपूर्ण ग्राहक, जनता त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाने अनेकांचा बळी घेतला आहे आणि भाजपचे लोक त्याचे राजकारणच करण्यात मग्न आहेत. येत्या नगरपालिका निवडणुकीत याचे परिणाम भाजपला पहावयास मिळतील. मतदार भाजपचाच सर्जिकल स्ट्राईक करतील. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही या निर्णयाबद्दल रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

पार्श्वनाथ बँकच का?
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा बँकेचे नाव घेतले. मग तुम्ही पार्श्वनाथ बँकेचेच नाव का घेत आहात? या प्रश्नावर आ. मुश्रीफ म्हणाले की, हा प्रश्न चंद्रकांतदादांनाच विचारा, तेच याचे उत्तर देतील.

Web Title: Inquire about old notes in Parsvnath Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.