इचलकरंजी पालिका कारभाराची चौकशी करा
By admin | Published: August 15, 2016 12:56 AM2016-08-15T00:56:40+5:302016-08-15T00:56:40+5:30
उच्च न्यायालयाचे आदेश : धैर्यशील सुतार यांची माहिती
इचलकरंजी : येथील नगरपालिकेमधील गैरकारभाराची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत विभागाला दिले असल्याची माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
साधारणत: डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने नगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील चौकशी निवडणुका समोर असतानाच होणार असल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेकडील गैरकारभाराची चौकशी करावी, अशा आशयाची याचिका अॅड. सुतार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सुनावणी न्यायाधीश हिमांशू केमकर व न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर जून महिन्यात झाली. त्यावेळी नगरपालिका संचलनालयाचे संचालक यांना गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रतिवादी करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे लेखी कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी पालिका असमर्थ
नगरपालिकांची असलेली विविध कर्तव्ये इचलकरंजी नगरपालिका पार पाडू शकत नाही. त्यामध्ये पंचगंगा नदी प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, आदींचा शहरात बोजवारा उडाला आहे. नगरपालिकेकडील खर्च अवाढव्य वाढला आहे. त्यामुळे पालिकेची दैनंदिन कार्ये पार पाडण्यात पालिका असमर्थ ठरली आहे. भुयारी गटार योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशी कामेसुद्धा भ्रष्टाचारामुळे पूर्ण होऊ शकत नाहीत, अशा आशयाचे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत.