थेट पाईपलाईनच्या कामाची चौकशी करणार
By admin | Published: October 27, 2015 12:45 AM2015-10-27T00:45:55+5:302015-10-27T00:53:07+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : कमिशनसाठी परवानगी न घेता काम सुरू असल्याचा आरोप
कोल्हापूर : आवश्यक असलेल्या विविध खात्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या परवानग्या न घेता केवळ कमिशनसाठी थेट पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामाची चौकशी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी एका खासगी दूरचित्रवाहिनीने आयोजित केलेल्या महापालिकेचा रणसंग्राम कार्यक्रमात दिली. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कमिशनसाठी काम सुरू केल्याचा मुद्दा खोडून काढला. दादांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही दिला.
येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, पालकमंत्री पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी एकाच व्यासपीठावर येऊन महापालिका निवडणुकीतील भूमिका मांडली. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप रंगले. यावेळी अनेक प्रश्नांवर पालकमंत्री पाटील यांना अन्य नेत्यांनी घेरण्याचा व कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री पाटील यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणतेही काम सुरुवात करण्यापूर्वी सर्व परवानगी घेणे आवश्यक आहे; पण काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेले थेट पाईपलाईनचे काम कोणतीही परवानगी न घेता सुरू आहे. पाईपलाईन जेथून येणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती नाही. सार्वजनिक बांधकाम व वन विभागाची परवानगी नाही. त्यामुळे कमिशन काढून घेऊन ठेकेदाराला पहिला हप्ता देऊन काम सुरू केले आहे. उपनगरांत आरोग्याच्या सुविधा नाहीत. चांगला विकास झालेला नाही. त्यामुळे हद्दवाढीसाठी संबंधित गावांचा विरोध आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशी शासनाची भूमिका आहे.
आमदार मुश्रीफ म्हणाले, खासगी शेतीतून तीन फुटांखालून पाईपलाईन घेऊन जाण्यासाठी परवानगीची गरज नाही. दादांचा अभ्यास कमी आहे. हवे तर चंद्र्रकांतदादा यांच्या अध्यक्षतेखाली थेट पाईपलाईनच्या कामाची चौकशी होऊ दे. सतेज पाटील यांनी दादांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे, त्यांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्ला दिला.
टोलच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले, केवळ तांत्रिक अडचणीमुळे तीन महिन्यांसाठी टोल स्थगित केला आहे. टोल बंद करण्यासाठी शासनाने आयआरबीला किती पैसे द्यायचे हे निश्चित झाल्यानंतर कायमचा टोल बंद केला जाईल. कायमस्वरूपी टोलचे भूत कोल्हापूरकरांच्या मानगुटीवरून दूर केले जाईल.
मुश्रीफ म्हणाले, शंभर दिवसांत टोलमुक्त करू असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात एक वर्ष पूर्ण झाले तरी टोल कायमपणे हद्दपार करण्यात भाजपला यश आले नाही. त्यामुळे पुन्हा टोल सुरू होणार आहे.
सतेज पाटील यांनी, शासनाच्या तिजोरीत खणखणाट आहे, त्यामुळे पुन्हा टोल सुरू होणार नाही या आश्वासनावर विश्वास नाही, असे सांगितले. क्षीरसागर यांनी १४०० कोटी विकासासाठी निधी आला असेल तर तो गेला कोठे, असा सवाल उपस्थित केला. शहरातील मूलभूत समस्या कायम आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.
निवडणुकीत गुंडगिरी; दहशतीचा वापर
ताराराणी आघाडीचे लोक काही प्रभागांत पैसे वाटताना मिळाले आहेत. याच कारणावरून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात हाणामारी झाली आहे. वाहने फोडली आहेत. कार्यालयावर हल्ला केला आहे. अशाप्रकारे भाजप-ताराराणी आघाडी गुंडगिरी, दहशत माजवून धुमाकूळ घालते आहे, असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला. मुश्रीफ यांनीही ताराराणी-भाजपचेच लोक पैसे वाटून दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप केला. यावर हा आरोप खोटा असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
जोरदार विरोध...
निवडणुकीत मारामारी, पैसे वाटणे असे प्रकार घडतच असतात, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर मंत्री पाटील यांनी, वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये, पैसे वाटणे, गुंडगिरी करणे यामध्ये भाजपचा कोठेही संबंध नाही, केवळ दोन गटांत मारामारी झाली आहे, असे सांगितले.