बोगस शौचालयांची ‘चौकशी’ होणार!

By admin | Published: February 11, 2016 11:37 PM2016-02-11T23:37:56+5:302016-02-11T23:40:10+5:30

गडहिंग्लज पंचायत समिती सभा : उपसभापतींकडून ग्वाही; ‘लोकमत’चा दणका

'Inquiry' of bogus toilets will be done! | बोगस शौचालयांची ‘चौकशी’ होणार!

बोगस शौचालयांची ‘चौकशी’ होणार!

Next

गडहिंग्लज : ‘शौचालय’ अनुदानातही हात धुण्याच्या प्रकाराबद्दल विरोेधकांनी सत्ताधारी आणि पंचायत समिती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील संशयास्पद एक हजार लाभार्थ्यांच्या शौचालयांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याबरोबरच दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्वाही
उपसभापती तानाजी कांबळे यांनी गुरुवारी दिली.
‘लोकमत’ने बुधवारी हॅलो पान एकवरील ‘विशेष वृत्तात’ ‘शौचालय’ अनुदानातही हात धुण्याच्या जिल्ह्यातील प्रकारावर प्रकाशझोत टाकला आहे. गडहिंग्लज तालुक्यातही अशा प्रकारचे सुमारे एक हजार अर्ज अनुदानासाठी दाखल झाले आहेत. ‘लोकमत’च्या बातमीचा दाखला देत जनता दलाचे बाळेश नाईक व भाजपचे अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी अध्यक्षस्थानी असणाऱ्या उपसभापतींसह सहायक गटविकास अधिकारी जगदाळेदेखील निरुत्तर झाले.
या विषयावरील चर्चेत तुमचेही हात धुतले का? असा सवाल नाईक यांनी केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे माजी सभापती अमर चव्हाण व इकबाल काझी यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तुम्ही सभापतींचे वकीलपत्र घेतले आहे का? आम्हाला सभापतींकडूनच उत्तर हवे, असा आग्रह विरोधकांनी धरला, त्यावर चौकशीची ग्वाही देण्यात आली.
वादग्रस्त नळ योजनांच्या कामाकडे कोलेकरांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, यापूर्वीच अर्धवट नळ योजनांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, जांभूळवाडी योजनेच्या ठेकेदारावर फौजदारी झाली. त्यानंतर त्याच ठेकेदाराने माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी उकळल्याची तक्रार ‘त्या’ कार्यकर्त्यांवर केली आहे. एकीकडे राज्य पातळीवर बक्षिसे मिळविणाऱ्या गडहिंग्लज पंचायत समितीची बदनामी होत आहे. त्यामुळे त्वरित समिती नेमून रखडलेल्या सर्व योजना मार्गी लावाव्यात, अशी सूचना कोलेकर यांनी केली. त्यावेळी यासाठीही चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन उपसभापतींनी दिले.
‘ज्ञानरचनावादा’च्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक या दोघांनीही गटशिक्षणाधिकारी कमळकरांची कोंडी केली. लक्षावधी रुपये खर्चून राबविलेल्या ई-लर्निंगचे काय झाले? तसाच प्रकार ज्ञानरचनावादाचाही सुरू आहे. अप्रगत विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करायचे सोडून भलतेच काम सुरू आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.
हेब्बाळसारख्या शाळेत दीड-दोन वर्षे विद्यार्थी अप्रगत राहिलेत. त्यामुळे त्यांना शिकविण्यात कमी पडलेल्या अप्रगत शिक्षकांची यादी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. तालुक्यातील शाळांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे एम. आर. प्रशालेच्या मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभार ‘गशिअ’नी सोडावा, अशी सूचना त्यांनी केली. त्यास नाईक व कोलेकर या दोघांनीही दुजोरा दिला.
‘शिक्षण व शेती’ विभागाच्या चर्चेत अधिकाऱ्यांवर तुटून पडलेले सत्ताधारी आणि विरोधक ‘सार्वजनिक नळ योजना आणि शौचालय’ अनुदानाच्या प्रश्नांवरील चर्चेत एकमेकांशी भिडले. त्यांच्या ‘एकी’ची व ‘जुगलबंदी’चीही चर्चा सभेनंतरही झाली. (प्रतिनिधी)

पशुपालकांचा गौरव
‘बेस्ट डेअरी वूमन फार्मर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल नूलच्या सुरेखा शेगुणशी यांच्यासह मनोहर घोरपडे (अत्याळ), बाबूराव बावडेकर (नेसरी), दिनकर पाटील (हरळी बुद्रुक) व अजिंक्य पताडे (महागाव) या पशुपालकांचा सभेत सत्कार करण्यात आला.

Web Title: 'Inquiry' of bogus toilets will be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.