येणेचवंडी पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:27 AM2019-03-19T11:27:30+5:302019-03-19T11:29:08+5:30
येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर : येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार ग्रामस्थ अंकुश कुराडे यांनी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन पुणे विभागाचे नियोजन शाखेचे उपायुक्तउत्तम चव्हाण यांच्याकडे तक्रार वर्ग करण्यात आली आहे. परिणामी योजनेत ढपला मारलेल्या पुढाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पाणीटंचाई कायस्वरूपी निकालात निघण्यासाठी एक कोटी रुपये खर्चून पेयजल योजनेतून दोन योजना राबविल्या. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणातून पाणी उपसण्यासाठी जॅकवेल बांधण्यात आले; मात्र जॅकवेलपर्यंत ऐन उन्हाळ्यात पाणी पोहोचत नाही. पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा निकृष्ट दर्जाची आहे. यामुळे पाणी पिण्यास योग्य नाही. जॅकवेलजवळील पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने पाणीटंचाई निर्माण होते. अशा अनेक प्रकारच्या त्रुटी योजनेत आहेत.
वारंवार अंतर्गत पाईपलाईन फुटते. यामुळे ग्रामस्थांची ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे. योजनेत काही गाव पुढाऱ्यांनी मोठा ढपला मारला आहे, कामात भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी कुराडे मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत.
यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये ठळकपणे रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर योजनेतील गैरकामकाजाचे बिंग फुटले. प्रशासकीय पातळीवरही धावाधाव सुरू झाली आहे. गावाबाहेर राहून सूत्रे हलविणारे पुढारी ढपला चव्हाट्यावर येऊ नये; यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहेत; मात्र कुराडे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता, ठोस पाठपुराव्याचा रेटा लावल्याने त्यांची अडचण झाल्याचे चित्र आहे.
कामात पैसे मुरवल्याची चर्चा
योजनेत डल्ला मारून काही कारभारी मालामाल झाल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; पण एकमेकांचे नातेवाईक, पै-पाहुणे, संधी साधू राजकीय हितसंबंधामुळे तक्रार करण्यास कोणी पुढाकार घेतले नव्हते. स्वच्छ पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय, हाल पाहून कुराडे यांनी तक्रार करण्याचे धाडस केले.
इस्टिमेट वाढविण्यासाठी पुढाऱ्यांनी जॅकवेलची जागा चुकीची निवडली. पाईपही निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. ते वारंवार फुटतात. पाईपलाईन टाकतानाही पुढाºयांनी आपल्या शेताजवळून कशी जाईल, यावर विशेष लक्ष दिले. यामुळे पाणी योजनेची वाट लागली. यातील दोषींना कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करत राहणार आहे.
अंकुश कुराडे, तक्रारदार