काळम्मावाडी डाव्या कालव्याच्या कामाची चौकशी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आदेश : आमदार आबिटकर यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:32+5:302020-12-16T04:39:32+5:30
कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाचा डावा कालवा ३२ ते ७६ किलोमीटरमधील मातीकाम, अस्तरीकरण व बांधकामाच्या कामाची स्वतंत्र विशेष गुणनियंत्रण ...
कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाचा डावा कालवा ३२ ते ७६ किलोमीटरमधील मातीकाम, अस्तरीकरण व बांधकामाच्या कामाची स्वतंत्र विशेष गुणनियंत्रण दक्षता पथक नेमून फेरचौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी दिले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी त्यासंबंधी तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. तत्काळ या कामाची फेरनिविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणीही आमदार आबिटकर यांनी केली.
काळम्मावाडी हा आंतरराज्य प्रकल्प असून त्याच्या डाव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याकरिता २२ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपयांचे काम ठेकेदारास दिले होते. हे काम ठेकेदाराने वेळेत पूर्ण न केल्यामुळे रक्कम वाढून ३५० कोटी रुपयांपर्यंत गेली. ठेकेदाराने चार वर्षांमध्ये काम पूर्ण करणे बंधनकारक असताना या कामास २०२० उजाडले तरी आजतागायत काम ठप्प आहे. झालेले कामही निकृष्ट दर्जाचे आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने या कामाकडे अधिकारी वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची असतानाही ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. यास जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून, अद्यापही कालव्याचे ३० टक्क्यांहून अधिक काम अपूर्ण आहे. या कामाच्या दर्जाची तपासणी मुख्य अभियंता, पुणे यांनी दक्षता पथक नेमून केली होती. ही चौकशी गोपनीय पद्धतीने करून ठेकेदारास अभय देण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून याबाबत दक्षता पथकाकडून तपासाचा फार्स केल्याबद्दल मुख्य अभियंता यांच्याकडून खुलासा घेण्याचीही मागणी आमदार आबिटकर यांनी केली.
(विश्वास पाटील)