कु ष्ठरुग्ण हेळसांडप्रकरणी चौकशी सुरू, लिपिकानेच दिला नव्हता धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 01:40 PM2019-11-15T13:40:16+5:302019-11-15T13:42:11+5:30
शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकींचे मानधन थकल्याने कुष्ठरुग्णांनाच स्वयंपाक करावा लागत असल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मार्च २०१९ मध्ये स्वयंपाकी महिलांच्या मानधनाचा धनादेश तयार करूनही तो लिपिक बाबूराव कात्रे यांनी दिला नसल्याचे निदर्शनास आले असून, गुरुवारी एकाचवेळी ८४ हजार रुपयांच्या मानधनाचा धनादेश दिल्यानंतर स्वयंपाकी महिला कामावर हजर झाल्या आहेत.
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकींचे मानधन थकल्याने कुष्ठरुग्णांनाच स्वयंपाक करावा लागत असल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मार्च २०१९ मध्ये स्वयंपाकी महिलांच्या मानधनाचा धनादेश तयार करूनही तो लिपिक बाबूराव कात्रे यांनी दिला नसल्याचे निदर्शनास आले असून, गुरुवारी एकाचवेळी ८४ हजार रुपयांच्या मानधनाचा धनादेश दिल्यानंतर स्वयंपाकी महिला कामावर हजर झाल्या आहेत.
कुष्ठधाम रुग्णालयातील स्वयंपाकी दोन महिलांचे एक वर्षापासून मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून काम बंद केले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी गॅस संपल्याने कुष्ठपीडित येथील स्वयंपाकघराच्या बाहेरच चुली मांडून भात-आमटी तयार करून खात होते. अनेक कुष्ठपीडित रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या हाता-पायांना संवेदना नाही अशा अवस्थेत ते चुलीवर स्वयंपाक करत होते. त्यातून भाजण्यासारखी गंभीर घटना नाकारता येत नव्हती. याबाबतचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध होताच प्रशासन तत्काळ जागे झाले.
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दुपारी या शेंडा पार्कमध्ये या कुष्ठरुग्णांची भेट घेतली आणि डॉ. फारूक देसाई यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. देसाई यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, ते आज, शुक्रवारी अहवाल सादर करणार आहेत.
या दोन स्वयंपाकी महिलांचे गेल्या वर्षभराचे मानधन थकल्याने त्यांनी काम थांबविले होते. ८४ हजार रुपयांच्या मानधनाचा धनादेश गुरुवारी दुपारी त्यांना देण्यात आल्यानंतर त्या कामावर हजर झाल्या. दरम्यान, सावली फौंडेशननेही या रुग्णांना आहार देण्याची तयारी दर्शविली होती.
कात्रे यांच्यावर कारवाईची शक्यता
क रवीर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुणाजी नलवडे यांच्याकडे या विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांनी हे काम पाहणारे लिपिक बाबूराव कात्रे यांना मानधनाचा धनादेश मार्च २०१९ मध्ये सही करून दिला होता. त्यानंतर तीन महिने उलटल्यानंतर तो रद्द करावा लागला. पुन्हा धनादेश काढूनही कात्रे यांनी या महिलांना हा धनादेश न दिल्याने कुष्ठरुग्णांवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
एवढा गलथानपणा कसा?
या महिला वर्षभर मानधन न मिळाल्यानंतरही कुणाशीही का बोलल्या नाहीत, बोलल्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली की नाही, दहा दिवस या महिला कामावर येत नसल्याचे डॉ. नलवडे यांना कधी समजले, त्यापुढे त्यांनी काय कारवाई केली आणि आरोग्य विभागाच्या पातळीवर इतका गलथानपणा कसा, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.