एचडीएफसी बँक आॅनलाईन दरोड्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:36 PM2019-05-06T16:36:16+5:302019-05-06T16:37:38+5:30
एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे.
कोल्हापूर : एचडीएफसी बँकेच्या येथील शाहूपुरी शाखेतून ६७ लाख ८८ हजार रुपयांच्या आॅनलाईनद्वारे दरोड्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. परिक्षेत्रातील आठ पथकांद्वारे या गुन्ह्याचा तपास चालू आहे.
रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी सायबर पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केले. आतापर्यंत या गुन्ह्यात झारखंड येथून तीन आणि कोलकाता येथून एक असे चार संशयित ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, झारखंड येथील आधार हौसिंग फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली असून, या आॅनलाईन दरोड्यामध्ये मोठे रॅकेट असल्याचे निदर्शनास आले आहे. कोलकाता येथून एकाला ताब्यात घेतले आहे.
ओरिसा येथून या चौघा संशयितांना घेऊन पथक सोमवारी पहाटेपर्यंत कोल्हापुरात येत आहे. तपासाची व्याप्ती मोठी असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील आठ पथकांद्वारे तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी पथकांची बैठक घेऊन निरीक्षक मोरे यांनी तपासासंबंधी मार्गदर्शन केले.
सातारा येथे सायबर विभागाचे केंद्र आहे. येथील काही कर्मचारी आॅनलाईन दरोड्याची माहिती घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते. त्यांनीही पोलीस निरीक्षक मोरे यांची भेट घेऊन माहिती घेतली. आॅनलाईन दरोड्यातील मास्टरमाइंड हॅकर्सचा मुंबई, पुणे आणि कोल्हापूर सायबर विभागाचे पथक शोध घेत आहे. अद्यापही त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
हरियाणा येथील एचडीएफसी बँकेवर दरोडा
बँकेचे सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी अतिजलद संगणक कार्यप्रणालीचा आॅनलाईन वापर करून नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेचे व्यवहार असलेल्या एचडीएफसी बँकेवर १९ फेब्रुवारीला हॅकर्सनी दरोडा टाकला होता. त्यानंतर १९ एप्रिलला शाहूपुरी येथील एचडीएफसी शाखेवर दरोडा पडला.
शासकीय सुटीदिवशीच हॅकर्स आॅनलाईन दरोडा टाकत असल्याची पोलिसांना शंका आहे. रविवार सुटीदिवशी हरियाणा येथील एचडीएफसी बँकेवर आॅनलाईन दरोडा पडला आहे. त्यानुसार ५ जूनला शासकीय सुटी आहे. त्यावेळी हॅकर्स आॅनलाईन दरोडा टाकण्याची दाट शक्यता आहे.