चौकशी ‘ईडी’नेच करावी--राजू शेट्टी यांचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:53 AM2017-10-04T00:53:36+5:302017-10-04T00:53:36+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री केलेल्या व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने यामध्ये काही कारवाई व्हावयाची असेल,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी संस्थांना विक्री केलेल्या व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने यामध्ये काही कारवाई व्हावयाची असेल, तर या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नेच करावी, असा जबाब खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. शेट्टी यांनी केलेल्या तक्रारीनुसार या व्यवहारांची राज्य शासनाच्या राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीआयडी) चौकशी सुरू झाली असून, त्यासाठी हा जबाब घेण्यात आला.
राज्यातील ३६ सहकारी साखर कारखान्यांची ९६० कोटी रुपयांना विक्री झाली असून, बाजारभावाप्रमाणे या विक्रीपोटी १० हजार कोटी रुपये यायला हवेत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची त्यांची तक्रार आहे. मागच्या पाच वर्षांत अडचणीत आलेले कारखाने विक्री करण्याचा जणू सपाटाच सुरू होता. ज्यांच्या गैरकारभार व भ्रष्टाचारामुळे हे कारखाने बंद पडले, त्यांनीच स्वत:च्या खासगी संस्थेकडून किंवा कुणाला तरी पुढे करून हे कारखाने विकत घेतले आहेत. त्याबद्दल खासदार शेट्टी यांनी ईडी तसेच उच्च न्यायालयात याचिका व मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी ही चौकशी राज्य गुन्हे शाखेकडे सोपविली होती. या शाखेचे उपमहानिरीक्षक जय जाधव यांनी शेट्टी यांचा कोल्हापुरात येऊन जबाब नोंदविला.
शेट्टी यांनी सांगितले, ‘हा सगळा व्यवहारच संशयास्पद आहे. ज्या बँकांनी कर्ज दिले व ते थकीत राहिले म्हणून कारखाने विक्रीस काढले. ज्यांनी हे कारखाने विकत घेतले त्या संस्थेच्या संचालकांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. जिल्हा बँका व सहकारी बँकेच्या तत्कालीन पदाधिकारी व अधिकाºयांनी या व्यवहारात मोठा डल्ला मारला आहे. त्याबद्दल त्या-त्या कारखान्यांच्या सभासदांनी पुराव्यांनिशी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्याचे पुरावे गोळा करण्याची गरज आहे. त्यांच्याही साक्षी घेतल्या जाव्यात. या कारखान्यांची विक्री करताना मात्र कोणतेही आर्थिक निकष न पाळता खिसे भरण्याचे व्यवहार झाले आहेत.’
ऊस दराचा फैसला ‘स्वाभिमानी’च करेल
गाळप हंगामापूर्वी उसाचा दर जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत ठरविण्याची गेल्या १५ वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी ऊस दराचा फैसला ‘स्वाभिमानी’च करील, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना हाणला. आगामी गळीत हंगाम, ऊस परिषद आणि राज्यमंत्री खोत यांनी जाहीर केलेली एफआरपी + ३०० या पार्श्वभूमीवर शेट्टी बोलत होते. जयसिंगपुरात २८ ला ऊस परिषद होत आहे.