करवीर तहसीलमधील कारभाराची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:25 AM2021-09-03T04:25:24+5:302021-09-03T04:25:24+5:30
कोल्हापूर : करवीर तहसीलदार कार्यालयात गुंठेवारीच्या आदेशाद्वारे बोगस लेआऊट सादर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य ...
कोल्हापूर : करवीर तहसीलदार कार्यालयात गुंठेवारीच्या आदेशाद्वारे बोगस लेआऊट सादर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य अडचणीत आले असून शासनाचा महसूल बुडाला आहे तरी जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली १० वर्षे करवीर तहसील व उपाधीक्षक भूमिअभिलेख यांच्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीने बोगस गुंठेवारी आदेशाद्वारे व नगररचना विभागाच्या मंजुरीशिवाय लेआऊट सादर करून शासनाचा महसूल बुडवला आहे. या बोगसगिरीमुळे या लेआऊटमधील प्लॉट घेतलेले सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तपासणी समिती नेमली होती, त्याला आठ महिने होऊन गेले. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. तरी या विषयाची गंभीर दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी व शासनाचा बुडालेला महसूल वसूल करावा, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे. यावेळी शिवाजीराव जाधव, मंजित माने, सुजित चव्हाण उपस्थित होते.
--
फोटो नं ०२०८२०२१-कोल-शिवसेना निवेदन
ओळ : कोल्हापुरातील शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना करवीर तहसीलमधील भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
---