समाजकल्याण ट्रॅक्टर घोटाळ्याची चौकशी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:36+5:302020-12-12T04:39:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : समाजकल्याण विभागातील ट्रॅक्टर घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी शेवटची फाईल प्राप्त झाली. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : समाजकल्याण विभागातील ट्रॅक्टर घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी शेवटची फाईल प्राप्त झाली. आता याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम अहवाल येत्या आठवडाभरात शासनाकडे सादर केला जाणार आहे.
कोल्हापुरात राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जातींच्या बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबविली होती. ५५० गटांनी याचा लाभ घेतलाे पण यातील बरेचसे लाभार्थी बोगस आहेत. ट्रॅक्टरची परस्पर विक्री झाली आहे. बोगस नावाने खरेदी झाली आहे, अशी तक्रार ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई यांनी केली होती. याची दखल घेऊन समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने चौकशी समिती नेमली होती. १५ दिवसांपासून या समितीने कोल्हापुरात येऊन लाभार्थ्याच्या घरात जाऊन झाडाझडती घेण्याबरोबर विचारेमाळ येथील प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कागदपत्रांचीही तपासणी केली.
ही तपासणी प्रक्रिया व त्याचे अहवाल घेण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. शुक्रवारी त्याची शेवटची फाईल आल्यानंतर चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर करून समितीने अंतिम अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले. याबाबत आयुक्त डोके यांना विचारले असता, अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात तो शासनाकडे सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
अहवाल तयार होत असल्याने बोगस लाभ घेतलेल्यांचे धाबे दणाणले आहे. शासनाकडून कारवाई होण्याच्या भीतीने या लाभार्थ्यांनी संघटनांच्या नेत्यांकरवी मिटवामिटवी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत सरकारची बऱ्यापैकी फसवणूक झाल्याने राज्य शासनाचा समाजकल्याण विभाग काय भूमिका घेतो, याकडे आता लक्ष लागले आहे.