‘व्यंकटेश्वरा, रेणुका, उगार’कडून चौकशी
By admin | Published: April 21, 2017 11:10 PM2017-04-21T23:10:55+5:302017-04-21T23:10:55+5:30
वसंतदादा कारखाना निविदा प्रक्रिया : शुक्रवारी दिवसभरात अर्जाची विक्री नाही
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने देण्यासाठी निविदा अर्ज विक्री व दाखल करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर या तीन कारखान्यांनी जिल्हा बँकेकडे चौकशी केली. निविदा दाखल करण्याची मुदत ३ मेपर्यंत आहे.
थकीत ९३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी सांगली जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचा भाडेकरार किती वर्षांसाठी असावा, याचा निर्णय निविदाधारकांवर सोपविला आहे. कमीत-कमी कालावधित जास्तीत-जास्त भाडे देणाऱ्या संस्थेला प्राधान्याने कारखाना देण्याचे धोरण यामागे असण्याची चिन्हे आहेत. प्राप्त निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे. वसंतदादा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार ५०० टन आहे. कारखान्यासह डिस्टिलरी, यंत्रसामग्री, वापरातील इमारती, गोदामे व अन्य मालमत्ताही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यात हा कारखाना नव्या संस्थेकडे जाणार आहे.
निविदा अर्जांच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. वसंतदादा कारखाना भाडेतत्त्वाने चालविण्यासाठी सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कारखाने इच्छुक आहेत.
शुक्रवारी दिवसभरात व्यंकटेश्वरा, रेणुका शुगर व उगार शुगर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने जिल्हा बँकेशी संपर्क साधून माहिती घेतली. या तीन कारखान्यांसह राजारामबापू व अथणी शुगर या दोन कारखान्यांच्या निर्णयाकडेही सभासदांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
पारदर्शी प्रक्रिया : दिलीप पाटील
वसंतदादा कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेतला असला तरी, शेतकरी, कामगारांसह इतर बँकांच्या देण्यांबाबत आमची नैतिक जबाबदारी आहे. जो कोणी हा कारखाना घेईल, त्याला कारखान्याच्या देण्यांबाबत सर्व ती माहिती दिली जाईल. या निविदेत कोणतीही कायदेशीर चूक राहू नये, याची खबरदारी घेत आहोत. त्यासाठी कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत होत आहे. सक्षम कारखान्यासोबत आम्ही चर्चेलाही तयार आहोत. त्यासाठी प्रसंगी निविदेला मुदतवाढ देण्याचीही आमची तयारी आहे. निविदाधारकाला पुरेसा वेळ मिळावा आणि कारखाना पुन्हा सुरू व्हावा, हाच बँकेचा हेतू असल्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.